मी घरी बसून विकासकामे मार्गी लावली ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
संभाजीनगर येथे १ सहस्र ६८० कोटी रुपयांच्या जलयोजनेचा शुभारंभ
संभाजीनगर – कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मी नुसता घरी बसून नव्हतो. राज्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावत होतो. त्यामुळेच विविध कामांची उद्घाटने होत आहेत. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका करणार्यांना आम्ही काय केले हे लवकरच दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ डिसेंबर या दिवशी येथे केले. राज्यातील सर्वांत मोठ्या १ सहस्र ६८० कोटी रुपयांच्या जलयोजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, बीड-जालना येथे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक, वॉटर ग्रीडसाठी २६५ कोटी रुपये, शेंद्रा-बिडकीन कॉरिडॉर, तसेच ऑरिक सिटीत आयटी बेस आणि मोठे उद्योग आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. टाटा कन्सल्टन्सीशी बोलणी झाली आहेत. आरोग्याच्या सुविधांसाठीही उद्योग पार्क सिद्ध करण्यात येईल.
सिंहासन नको, आसंदीच बरी !पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सिंहासनासारख्या आसंदीची व्यवस्था करण्यात आली होती. व्यासपिठावर एक सिंहासनासारखी आसंदी आणि सहकारी मंत्र्यांसाठी साध्या आसंद्या पहाताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सिंहासनासारखी आसंदी काढायला सांगून साधी आसंदी मागवली. मुख्यमंत्र्यांनी सूचना देताच त्यांचे सुरक्षारक्षक आणि आयोजक यांची धावपळ उडाली. त्यांनी तात्काळ सिंहासनासारखी आसंदी काढून साधी आसंदी ठेवली. |