राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘गुरु ग्रंथ साहिब मधील संत नामदेव’ पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन
संत नामदेव यांनी देशभर भक्तीचा प्रचार केला ! – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे – महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या राज्याने देशाला अनेक महान संत दिले आहेत. भक्ती आणि शक्ती यांचा संगम महाराष्ट्रात आहे. संतांचा सन्मान हा आपला सन्मान आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून संत नामदेव यांच्याकडे गौरवाने पाहिले जाते. त्यांनी देशभर भक्तीचा प्रचार केला. संत नामदेव यांचे स्मरण करतांना साहित्यिकांनी नवीन पिढीला संतांविषयी माहिती करून देण्यासाठी अधिकाधिक साहित्य लेखन करायला हवे, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथ साहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १३ डिसेंबर या दिवशी पुणे विद्यापिठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले.
पुणे विद्यापिठाचे संत नामदेव अध्यासन आणि ‘सरहद’, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त देशभर राबवण्यात येणार्या विविध उपक्रमांचा शुभारंभही या वेळी करण्यात आला. सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकात संत नामदेवांची एकसष्ट पदे मराठी अन्वयार्थासह समाविष्ट केली आहेत. त्याचसमवेत त्या पदांचे संक्षिप्त सारग्रहणही दिलेले आहे. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते.