काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष शेतकर्यांच्या वेशात आंदोलनात सहभागी होऊन संभ्रम निर्माण करत आहेत ! – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
सिहोर (मध्यप्रदेश) – काँग्रेस आणि साम्यवादी डावे पक्ष शेतकर्यांच्या वेशात लपून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलनाला बसले आहेत. या देशविरोधी शक्ती शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असे विधान भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सध्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून केले. ‘पंजाबमधील काँग्रेस सरकारने हे नवीन कृषी कायदे लागू केलेले नाहीत. तरीही पंजाबमधील लोक देहलीमध्ये येऊन आंदोलन का करत आहेत ?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
किसानों के भेष में छिपे हैं वामपंथी और कांग्रेसी, देश विरोधी ताकतें फैला रही हैं भ्रम : साध्वी प्रज्ञा सिंहhttps://t.co/NY9tJeV3ZA
— NDTV India (@ndtvindia) December 12, 2020
खासदार साध्वी प्रज्ञासिंह पुढे म्हणाल्या की,
१. शाहीनबागमध्ये ज्या प्रकारे जे.एन्.यू.तील काही लोक, चित्रपट क्षेत्रातील काही साम्यवादी विचारांचे कलाकार सहभागी होते, तेच चेहरे आता पुढे येत आहेत. असे लोक देशाची हानी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना कारागृहात टाकणेच योग्य होईल.
२. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यात कुठल्याही सुधारणांची आवश्यकता नाही. सर्व सुधारणा करून हे कायदे आणले गेले आहेत.
भारत हिंदु राष्ट्र होईल !
साध्वी प्रज्ञासिंह बंगालविषयी म्हणाल्या की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा तीळपापड झाला आहे. हा भारत आहे, पाकिस्तान नाही. त्यांना हे समजले आहे. बंगालमध्ये भाजप आणि हिंदूंचे राज्य येईल. बंगाल हा अखंड भारताचा एक भाग आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. बंगालमध्ये आपले हिंदु राज्य होईल. भारत एक हिंदु राष्ट्र होईल.
वर्णव्यवस्थेचा राग का येतो ?
साध्वी प्रज्ञासिंह यांनी या वेळी वर्णव्यवस्थेवर टीका करण्याचाही विरोध केला. त्या म्हणाल्या, ‘‘क्षत्रियाला क्षत्रिय म्हटले, तर त्याला वाईट वाटत नाही. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणा, तर वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटले, तर वाईट वाटत नाही. शुद्राला शुद्र म्हटले की, वाईट वाटते. कारण काय आहे ? तर समजू शकत नाही.’’