आखरी रास्ता कृती समितीच्या निवेदनानंतर गंगावेस ते शिवाजी पूल वाहतूक एकेरी मार्ग चालू
कोल्हापूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – गंगावेस ते शिवाजी पूल या मार्गावरील रस्त्याच्या एका टप्प्याचे काम सध्या पूर्ण झाले असून यातील शुक्रवार गेट ते शिवाजी पूल पाणीवाहिनी आणि भुयारी गटार वाहिनी यांचे काम चालू होत आहे. या मार्गावर सकाळी ६ नंतर ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे ऊस वाहतूक चालू असते. या मार्गावरील रस्ता उकरल्याने अगोदरच वाहतुकीसाठी अडथळा होत असून ऊस वाहतुकीमुळे वाहतूक आणखीन बिकट होत आहे. तरी गंगावेस ते शिवाजी पूल वाहतूक एकेरी मार्ग चालू करावा, या मागणीसाठी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची त्वरित नोंद घेऊन शहर वाहतूक शाखेने गंगावेस ते शिवाजी पूल एकेरी मार्ग वाहतूक चालू केली आहे.
या वेळी आखरी रास्ता कृती समितीचे मुख्य संयोजक आणि संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, सर्वश्री राकेश पाटील, महेश कामत, सुरेश कदम, सनी अतिग्रे, युवराज जाधव आदी उपस्थित होते.