भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड आस्थापनाच्या पाईप नॅचरल गॅसच्या नोंदणीस आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रारंभ !
सांगली – केंद्रशासनाच्या भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड आस्थापनाच्या वतीने सांगली आणि सातारा जिल्हा येथे पाईपलाईन नॅचरल गॅस जोडणी योजना राबवण्यात येत आहे. सदर गॅसचा वापर प्रामुख्याने घरगुती, तसेच सी.एन्.जी. पंप या ठिकाणी करण्यात येणार आहे. सध्या सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ८, ९, १०, १७ आणि १९ या प्रभागांमध्ये नोंदणी करण्यात येणार आहे. विश्रामबाग येथील गणपति मंदिराशेजारी पाईप नॅचरल गॅसच्या नोंदणीचा प्रारंभ १२ डिसेंबर या दिवशी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला.
या संदर्भात आमदार श्री. सुधीर गाडगीळ म्हणाले, या गॅस प्रकल्पामुळे नागरिकांना वाहिनीद्वारे घरपोच गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. हा गॅस सुरक्षित, स्वच्छ, स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधन आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी याची नोंदणी करावी. या वेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. शेखर इनामदार, नगरसेवक सर्वश्री संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, धीरज सूर्यवंशी, तसेच भारत गॅस आस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.