धर्मप्रेमी युवकांकडून झाडाखाली ठेवलेल्या हिंदु देवतांच्या प्रतिमांचे विधीवत् विसर्जन !
देवतांच्या प्रतिमांचे विधीवत् विसर्जन करण्यात पुढाकार घेणार्या हिंदु युवकांचे अभिनंदन ! अशा युवकांचा आदर्श सर्वांनी घ्यावा.
बेळगाव – रिसालदार गल्ली येथील खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील वडाच्या झाडाखाली हिंदु देवतांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. याचे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची नोंद घेऊन काही धर्मप्रेमी हिंदू युवकांनी एकत्रित येऊन या सर्व प्रतिमा संकलित केल्या. ‘फ्रेम’ आणि काचा बाजूला काढून त्यातील छायाचित्रांचे जक्कीनहोंड येथे विधीवत् पूजन करून विसर्जन केले. यात सर्वश्री लोकनाथ रजपूत, सतीश गव्हाणे, संजय पाटील यांच्यासह इतर तरुणांनी पुढाकार घेतला. (हिंदु समाजाला धर्मशिक्षण नसल्याने, तसेच धर्माभिमान नसल्याने ते देवतांच्या प्रतिमा योग्य प्रकारे विसर्जित करण्याऐवजी नदीकाठी अथवा जागा मिळेल तिथे टाकून देतात. अशा कृतींमुळे देवतांचा अवमान होतो, ते त्यांच्या लक्षात येत नाही. यासाठीच हिंदु समाजाला धर्मशिक्षणाची अत्यावश्यकता आहे हे लक्षात येते ! – संपादक)
घरातील काच फुटलेल्या आणि जीर्ण झालेल्या देवतांच्या प्रतिमा नागरिक जागा मिळेल तेथे ठेवत आहेत. बर्याच वेळा ते कचर्याशेजारी टाकण्याचे प्रकारही घडत आहेत. रिसालदार गल्ली येथील वडाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात देवतांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. ही गोष्ट लक्षात येताच युवकांनी पुढाकार घेऊन त्यांचे विधीवत् विसर्जन केले.