३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगोला येथे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सांगोला (जिल्हा सोलापूर), १२ डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवावेत, तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारे मद्यपान, धूम्रपान आणि मेजवान्या (पार्ट्या) करणे यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगोला येथील तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. तहसीलदारांच्या वतीने वसंत उगले आणि पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी निवेदन स्वीकारले.
या वेळी परशुराम युवा मंचचे डॉ. मानस कमलापूरकर, पत्रकार नागेश जोशी, श्रीराम सेनेचे कार्याध्यक्ष संजय गव्हाणे, तालुकाध्यक्ष मयुरेश गुरव, प्रवीण लांडगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धीरज गुरव, हिंदु जनजागृती समितीचे संतोष पाटणे, अक्षय क्षीरसागर, दीप पाटणे, सागर माळी, अविनाश बनसोडे, लक्ष्मीकांत पाचंगे, हरिभाऊ केदार यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा वेळी ३१ डिसेंबरला मेजवान्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी किंवा ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) बंदी घालावी.
विशेष
१. निवेदन देण्यास आलेल्या धर्मप्रेमींनी स्वयंस्फूर्तीने सहकार्यांना संपर्क करून निवेदन देण्यासाठी बोलावून घेतले.
२. काही धर्मप्रेमींनी निवेदन दिल्यानंतर छायाचित्र आणि बातमी एकत्र करून अन्य ‘व्हॉट्सअॅप’च्या गटांमध्ये प्रसारित केली.
३. या वेळी काही धर्मप्रेमी म्हणाले की, यापुढे निवेदन देण्यासाठी आणखी धर्मप्रेमींना एकत्र करू.