जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यात ५५ टक्के, तर उत्तर गोव्यात ५८.४३ टक्के मतदान
|
पणजी – कोेरोना महामारीच्या सावटाखाली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १२ डिसेंबर या दिवशी ५६.८२ मतदान झाले. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी ५५ टक्के, तर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी ५८.४३ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे या वेळी ३१ कोरोनाबाधित रुग्णांनीही ‘पीपीई’ किट घालून निर्धारित वेळेत मतदान केले, काही भागांत स्थानिक सूत्रांवरून संबंधितांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला.
निवडणुकीला सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. मतदान मतपत्रिकेवर शिक्का मारून करण्यात येत होते. मतदारांनी ‘मास्क’ घालून मतदान केले. मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी मतदाराचे शरिराचे तापमान तपासण्यात आले. राज्यात दुपारी १२ वाजेपर्यंत जवळपास २६.३२ टक्के मतदानाची नोंद झाली. २ मतदारांमध्ये २ मीटरचे अंतर ठेवून उभे रहाण्याच्या अटीमुळे अनेक ठिकाणी रांगा दिसून येत होत्या. इच्छुक कोरोनाबाधित रुग्णांना राज्य निवडणूक आयोगाकडून पीपीई किट पुरवण्यात आले होते. निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुमारे ५ सहस्रांहून अधिक जिल्हा आणि आय.आर्.बी. पोलीस मतदान केंद्रांवर नेमण्यात आले होते.
काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी
१. मतदारसूचीतील मतदाराचा ‘सिरियल नंबर’ मतपत्रिकेच्या मागे लिहिल्याने मतदाराची गोपनीयता धोक्यात आल्याची तक्रार ‘आप’ने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
२. साळ, डिचोली आदी काही ठिकाणी मंडपाची सोय नसल्याने कडक उन्हात रांगेत उभे राहून मतदारांना मतदान करावे लागले.
३. काही मतदान केंद्रांमध्ये कोरोना महामारीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नाही आणि यामुळे सध्या आटोक्यात आलेल्या कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्यात येत नव्हते, मतदाराच्या शरिराचे तापमान तपासण्यासाठीच्या ‘थर्मल गन’चा वापर करण्यात येत नव्हता किंवा ‘थर्मल गन’ चालत नसणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, मतदान केंद्रातील अधिकार्यांनी ‘फेस शिल्ड’चा वापर न करणे, अशा त्रुटी लक्षात आल्या.
४. ‘आप’ने ‘गोमंतकियांनो, आज मतदान करतांना ‘गोव्याला पालट पाहिजे’, हे लक्षात ठेवा. तो पालट म्हणजे आम आदमी पार्टी. तो पालट घडवून आणण्यासाठी ‘आप’ला मतदान करा’, असा संदेश भ्रमणभाषद्वारे पाठवला. ‘निवडणुकीच्या दिवशी असा प्रसार करू शकतो का ?’, असा प्रश्न मतदारांना पडला होता.
प्रतिक्रिया
१. जिल्हा पंचायत निवडणूक ही शासनासाठी खेळातील उपांतफेरीप्रमाणे आहे. आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे किती जण नाराज झालेे आहेत, ते या निवडणुकीनंतर समजू शकेल, असे मत महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
२. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ‘नोटा’ (एकही उमेदवार लायक नसणे) पर्याय का ठेवण्यात आला नाही? यामुळे जिल्हा पंचायत निवडणूक आणि ही निवडणूक घेणार्या निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली वावरत आहे का ? असा प्रश्न उद्भवतो, असे मत ‘नूसी’ या विद्यार्थी संघटनेचे गोवा विभाग प्रमुख अहराज मुल्ला यांनी व्यक्त केले.
क्षणचित्रे
१. मये विधानसभा मतदारसंघात येणार्या मावळिंगे गावातील नागरिकांनी गावातील खराब रस्त्याची दुरुस्ती न केल्याच्या निषेधार्थ निवडणुकीवर बहिष्कार घातला. या ठिकाणी दुपारी १ वाजेपर्यंत केवळ दोघांनीच मतदान केले होते. याविषयी माजी सरपंच मधू नाईक म्हणाले, ‘‘ग्रामस्थांची खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्याची एकमेव माागणी आहे आणि या विषयावर ते संघटित आहेत. ग्रामस्थांची मागणी मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवरही ग्रामस्थ बहिष्कार घालणार आहेत.’’
२. प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला विरोध होत असलेल्या शेळ, मेळावली येथे जिल्हा पंचायत निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
३. मंदिराच्या बांधकामाला भूमी मिळत नसल्याच्या कारणास्तव मापा, पंचवाडी, शिरोडा येथील लोकांनी मतदानावर बहिष्कार घातला.
‘नोटा’चा पर्याय नसल्याविषयी पत्रकाराची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारपणजी – जिल्हा पंचायत निवडणुकीत ‘नोटा’चा (एकही लायक उमेदवार नसल्यास उपलब्ध असलेला पर्याय) पर्याय उपलब्ध न केल्याने ज्येष्ठ पत्रकार अनिल लाड यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. निवडणुकीतून ‘नोटा’ हा पर्याय का हटवण्यात आला, याचा आयोगाने खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. |
दोन्ही जिल्हा पंचायतींवर काँग्रेसचेच वर्चस्व रहाणार ! – गिरीश चोडणकरपणजी – उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतींवर काँग्रेस पक्षच वर्चस्व प्रस्थापित करणार आहे. जनता भाजप शासनाला कंटाळली आहे. अनेक ठिकाणी लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे मतदानाविषयी लोकांमध्ये जागृती करण्यास राज्य निवडणूक आयोग आणि राज्यशासन अपयशी ठरल्याचे सिद्ध होते, असे मत गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले. |