जि.पं. निवडणूक लादली नाही, तर ती नियमानुसार योग्य वेळी घेतली ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
वास्को – जिल्हा पंचायत निवडणूक जनतेवर लादली नाही, तर ती नियमानुसार योग्य वेळी घेण्यात आली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. ‘मिग-२९’च्या दुर्घटनेत मृत झालेले कमांडर निशांत सिंह यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तरादाखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली. या सांत्वनपर भेटीच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत नगरविकासमंत्री मिलिंद नाईक हेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढू शकते. इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही जिल्हा पंचायत निवडणूक घेण्यात आली. राज्यात लवकरच नगरपालिका निवडणूकही होऊ शकते.’’
कमांडर निशांत सिंह यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘कमांडर निशांत सिंंह यांच्या निधनामुळे केवळ सैन्याचीच नव्हे, तर देशाची मोठी हानी झाली आहे. कमांडर निशांत सिंह हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.’’