सावंतवाडी शहरात अज्ञातांनी केलेल्या प्राणघातक आक्रमणात टेम्पोचालक गंभीर घायाळ
२ अज्ञातांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
सावंतवाडी – कोल्हापूर येथून सावंतवाडीला साहित्य घेऊन आलेल्या टेम्पोचालकावर शहरातील जिमखाना मैदानाजवळ दोघा अज्ञातांनी चाकूने आक्रमण करून त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेत टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) हे गंभीर घायाळ झाले. त्यांना पोलिसांच्या साहाय्याने स्थानिकांनी रुग्णालयात भरती केले.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार पाटील हे आयशर टेम्पोतून ग्रॅनाईट आणि टाईल्स घेऊन गगनबावडा येथून १२ डिसेंबरला पहाटे साडेचार वाजता सावंतवाडी येथे आले. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या २ व्यक्तींनी त्यांचा टेम्पो अडवला आणि पाटील यांच्याकडे भ्रमणभाष संच आणि पैसे यांची मागणी केली. त्यामुळे पाटील यांनी त्यांच्याकडील २ भ्रमणभाषपैकी १ भ्रमणभाष त्यांना दिला; मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने संबंधित व्यक्तींशी बाचाबाची झाली. त्यामुळे त्या दोघांनी पाटील यांच्या पोटावर आणि गळ्यावर चाकूने आक्रमण केले. या वेळी पाटील यांनी आरडाओरड केल्यानंतर आक्रमणकर्ते पसार झाले; मात्र गंभीर घायाळ झाल्याने पाटील यांनी टेम्पो चालू स्थितीत तसाच उभा केला. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली अन् नंतर पोलिसांनी पाटील यांना रुग्णालयात भरती केले. या प्रकरणी पोलिसांनी २ अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी शहरातील सर्व ‘सीसीटीव्ही फूटेज’ आणि आक्रमणकर्त्यांचे वर्णन यांवरून शोध चालू केला आहे. आंबोलीसह अन्य मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन संशयितांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी येथील पोलीस ठाण्यात चालू आहे.