कोरोना महामारीच्या काळात आधुनिक वैद्य आणि प्रशासन यांच्याविषयी आलेले वाईट अनुभव !
भारताची रुग्णांच्या संदर्भातील केविलवाणी दशा !कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना रुग्णांना एकूण प्रशासन आणि रुग्णालय यांच्याविषयी येत असलेले वाईट अनुभव हे संबंधितांना लज्जास्पद आहेत. या लेखावरून भारतातील रुग्णांच्या संदर्भात किती केविलवाणी दशा आहे, हेच दिसून येते. अशा हलगर्जी आणि दायित्वशून्य प्रशासनाकडे सरकारने दुर्लक्ष न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. रुग्णांना दिली जाणारी वागणूक आणि त्यांच्याविषयी केला जाणारा हलगर्जीपणा हिंदु राष्ट्रात (ईश्वरी राज्यात) नसेल, तर प्रत्येक रुग्णाची कुटुंबियांप्रमाणे काळजी घेण्यात येईल. या लेखात दिल्याप्रमाणे कुणाला असे वाईट अनुभव आले असल्यास नजीकच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवा ! – संपादक |
कोरोना महामारीच्या काळातही मास्क न वापरणारे दायित्वशून्य प्रतिष्ठित आधुनिक वैद्य !
‘जुलै २०२० मध्ये ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे कामानिमित्त गेलो असता तेथील स्थानिक आधुनिक वैद्यांची भेट घेतली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही (मी आणि माझे सहकारी) दोघांनीही मास्क घातला होता. आधुनिक वैद्यांच्या कक्षात गेल्यावर लक्षात आले की, त्यांनी मास्क घातला नव्हता. ते तसेच रुग्ण आणि वैद्यकीय प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत होते. हा प्रसंग झाल्यावर १०-१२ दिवसांनी मला बातमी कळली की, त्या आधुनिक वैद्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आला आहे. हे ऐकून धक्का बसला आणि भीती पण वाटली; कारण आम्ही त्या आधुनिक वैद्यांसमोर केवळ २ फूट अंतरावरून बोलत होतो.
एका प्रतिष्ठित आधुनिक वैद्यांचे असे वागणे सध्याची कोरोना महामारीची गंभीर स्थिती पहाता अपेक्षित नव्हते. अशा निष्काळजीपणामुळे ते स्वतः संक्रमित तर झालेच, त्याखेरीज त्यांच्या संपर्कात आलेले किती जण संक्रमित झाले असतील, याची कल्पनाच करवत नाही !’
– श्री. कैलास पाटील, सांगली (जुलै २०२०)
एका राज्यातील तपासणी नाक्यावर दिसून आलेली प्रशासनाची नियोजनशून्यता आणि कर्मचार्यांचे अयोग्य वर्तन
हिंदु राष्ट्रात असे कुठेही आढळून येणार नाही. पोलीस नम्रतेने बोलणारे असतील !
‘दळणवळण बंदीचे काही निर्बंध शिथिल केल्यानंतर एका राज्यातून दुसर्या राज्यात जाण्यासाठी प्रशासनाची अनुमती मिळाली. त्यामुळे वैयक्तिक नियोजनानुसार अनेक नागरिकांनी एका राज्यातून दुसर्या राज्यात प्रवास करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे राज्यांच्या सीमांवरील कोविड तपासणी पथकावर प्रचंड ताण येऊन सर्वांचाच खोळंबा झाला. दोन राज्यांच्या सीमेवरील एका नाक्यावर एका राज्यशासनाच्या कोविड तपासणी पथकाविषयी साधकाला आलेले कटू अनुभव आणि तेथील नियोजनातील त्रुटी देत आहोत.
१. या तपासणी पथकामध्ये पुरेसे मनुष्यबळ नाही, तसेच नियोजनाचाही अभाव जाणवला. त्यामुळे प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्याची अनुमती घेण्यासाठी ५ ते ६ घंटे वेळ द्यावा लागत होता. सर्वच गोष्टींची पूर्तता करण्यासाठी एकाच ठिकाणी नियोजन केल्यामुळे प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे येथील कोविड तपासणी पथकाची तारांबळ उडल्याचे चित्र होते.
२. सामाजिक अंतर ठेवण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. पाऊस अखंड चालू असल्याने तेथील पत्र्याच्या शेडमध्ये पुष्कळ गर्दी झाली होती.
३. पोलीस अधिकार्यांची उद्धट भाषा !
या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस यंत्रणा अल्प पडत होत्या. त्यांना लोकांनी काही पर्याय सुचवले, तर ते ऐकण्याची पोलिसांची सिद्धता नव्हती. पोलिसांना काही सुचवण्याचा एका व्यक्तीने प्रयत्न केला. तेव्हा तेथील पोलीस अधिकारी त्या व्यक्तीवर चिडून म्हणाले, ‘‘तू मागे हो. नाहीतर तुझी कागदपत्रे फाडीन आणि तुझे डोकेच फोडीन.’’ अशा परिस्थितीत लोकांसमोर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घंटोन् घंटे रांगेत थांबण्याखेरीज पर्याय नाही.
४. अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीशी बोलल्यावर ती म्हणाली, ‘‘सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत आम्हाला सलग काम करावे लागते. आम्ही कसे काम करणार ?’’
५. या ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा योग्य प्रकारे नाही, तसेच पाणीही उपलब्ध नाही.’
– श्री. संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सप्टेंबर २०२०)