आपत्काळाविषयी साधकांना पडलेले प्रश्न आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोनांविषयी एका साधकाचे झालेले चिंतन !
येणार्या भीषण आपत्काळाविषयी साधकांना पडलेले प्रश्न आणि त्यांवर साधकांनी ठेवावयाच्या योग्य दृष्टीकोनांविषयी बेळगाव येथील श्री. मंदार विजय जोशी यांचे झालेले चिंतन !
परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी, संपूर्ण शरणागतभावाने कृतज्ञता !
परात्पर गुरुदेव, ‘आगामी आपत्काळात साधकांनी महानगर, नगर आणि शहर सोडून गावाकडे जाऊन रहाण्याचा विचार करावा !’ या आशयाचा दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख वाचला. त्यानंतर कुटुंबीय आणि साधक यांच्याशी चर्चा केल्यावर ‘सर्वांच्या मनात विविध प्रश्नांचे काहूर माजले आहे’, असे जाणवले. भगवंताला शरण जाऊन त्या विचारांवर चिंतन केले असता भगवंताने पुढील दृष्टीकोन उलगडून दाखवले आहेत. ते आपल्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहे.
‘परात्पर गुरुदेव, ‘जगन्नियंत्या भगवंताने (आपण) सुचवलेले विचार प्रथमच मांडत असल्याने लिखाणात चुका, कठोरपणा, अतिशयोक्ती अथवा अहं जाणवल्यास आपण या जिवास त्याची जाणीव करवून द्या आणि ‘लिखाण नेमके कसे असावे ?’, हे या पामरास शिकता येऊ द्या’, हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना !’
साधकांशी बोलण्यातून आलेले विविध प्रश्न आणि त्यांवरील भगवंताने उलगडून दाखवलेले दृष्टीकोन पुढे दिलेले आहेत.
(भाग १)
१. साधकांची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी भगवंताने आपत्काळ पुढे ढकलला असणे आणि भगवंताशी एकरूप होण्यासाठी गुर्वाज्ञेचे पालन करणे आवश्यक असणे
प्रश्न : गेल्या अनेक वर्षांपासून (आपत्काळ येणार आहे) हेच ऐकत आहोत; पण होत तर काहीच नाही. मग कशाला कुठे जायचे ? तसेच आम्हाला जे हवे होते, ते सर्व देवाने आम्हाला दिले आहे. आता जे व्हायचे, ते इथेच होऊ दे.
दृष्टीकोन : ‘ईश्वरी नियोजनानुसार आपत्काळ वर्ष १९९९ मध्ये येणार’, असे होते; परंतु तेव्हा ‘हिंदु राष्ट्र’ चालवण्याची क्षमता असलेले साधक निर्माण झाले नव्हते. ‘साधक निर्माण होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी भगवंताने (परात्पर गुरु डॉक्टरांनी) हा कालावधी हळूहळू वाढवून २० वर्षे पुढे ढकलला आहे’, याची जाणीव आपणास आहे का ? आता कालमहात्म्यानुसार हे होणे आवश्यक आहे. आपण आपल्या मनाची सिद्धता करून ‘गुरूंनी सांगितल्याप्रमाणे कृती करणे’, आपल्या साधनेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. आपली साधना होण्यासाठी भगवंताने आपल्याला त्याच्या कृपाछत्राखाली गेल्या अनेक वर्षांपासून ठेवले आहे. ‘आपल्याकडून कोणते कार्य त्याला करवून घ्यायचे आहे ?’, हे आपणास ठाऊक नाही. मग ‘जे व्हायचे, ते इथेच होऊ देत’, असे म्हणणे’, म्हणजे आपण देवाच्या कार्यात अडथळा बनल्यासारखे होणार. शेवटी भगवंताशी एकरूप व्हायचे असेल, तर गुर्वाज्ञेचे पालन करायला हवे.
२. ‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची मानसिक सिद्धता होणे’ हा मानसिक स्तरावरील व्यष्टी साधनेच्या अंतर्गत लढाऊ वृत्ती असणे
प्रश्न : कुटुंबातील इतरांना आपत्काळाचे गांभीर्य नाही. ते यायला सिद्ध नाहीत. मग आम्ही काय करायचे ?
दृष्टीकोन : कुटुंबातील इतर सदस्य साधना करत नसतील, तर त्यांना हे पटणारच नाही; पण प्रश्न हा आहे की, आपल्याला हे पटत आहे का ? आपली मनाची सिद्धता झाली आहे का ? सध्या सर्व साधकांची स्थिती अर्जुनासारखी झाली आहे. आपण मायेत अडकलो आहोत. ‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची आपली प्रत्येकाची मानसिक सिद्धता झाली आहे का ?’, याचे परीक्षण होणे आवश्यक आहे. ‘ही सिद्धता होणे’, हाच तर मानसिक स्तरावरील व्यष्टी साधनेच्या अंतर्गत लढाऊ वृत्तीचा भाग आहे. ‘भगवंत (परात्पर गुरुदेव) अतिशय दयाळू आहे. आज आपले कुटुंबीय जरी सिद्ध नसले, तरी आपली मानसिक सिद्धता होऊन शरणागती वाढली, म्हणजे साधना वाढली की, कुटुंबियांना तशी बुद्धी देऊन भगवंत त्यांना आपल्यासह आणेल’, याची निश्चिती बाळगूया.
‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा. त्यात अधिक आनंद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले, दैनिक ‘सनातन प्रभात’, २३.९.२०२०) |
३. शहर सोडून गावाकडे जाण्याने होणारे विविध लाभ लक्षात घेणे आवश्यक !
प्रश्न : आमचा व्यवसाय किंवा नोकरी आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या पोटापाण्याचा प्रश्न नाही. गावाकडे गेल्यावर हे सर्व शक्य होईल का ? गुंतवणूक, रोख रक्कम आणि दागिने यांचे काय करायचे ? ते कुठे ठेवायचे ?
दृष्टीकोन : प.पू. भक्तराज महाराज यांनी एका भजनात म्हटले आहे, ‘जेणे तुला जन्मीले, मारील तो का ?’ ज्या भगवंताने या काळात साधना करण्यासाठी आपल्या सर्वांना जन्म दिला आहे आणि त्याच्या कृपाछत्राखाली ठेवले आहे, तो आपत्काळात आपल्याला सोडून देईल का ?
वस्तूतः अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या प्रमुख तीन आवश्यकता आहेत. गावाकडे गेल्यावर तेथे आपल्याला शेती, भाजीपाला, औषधी वनस्पतींची लागवड आणि गोपालन करायचे आहे. त्यातून हा प्रश्न नक्कीच सुटू शकतो.
३ अ. सर्कशीतल्या झुल्यावरील मुलीच्या उदाहरणाप्रमाणे ‘आपण मायेच्या झुल्याचा हात सोडल्यावर भगवंत आपल्याला कसे पकडतो ?’, याची अनुभूती घ्यायची वेळ आता आलेली असणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘साधना’ हा विषय समजावतांना सर्कशीतल्या झुल्यावरील मुलीचे एक उदाहरण सांगितले आहे. त्यातील ती मुलगी म्हणजे आपण आहोत. ज्या झुल्याला तिने पकडले आहे, ते म्हणजे मोहजाल (माया) आणि दुसर्या झुल्यावर तो भगवंत आहे. आता जोपर्यंत आपण मायेच्या झुल्याचा हात सोडत नाही, तोपर्यंत दुसरीकडे असलेला भगवंत आपल्याला कसा पकडणार ? ‘आपण हात सोडल्यावर भगवंत आपल्याला कसे पकडतो ?’, याची अनुभूती घ्यायची वेळ आता आली आहे.
३ आ. ‘आपण स्वतः कमावलेल्या पैशावर जगत आहोत’, हे खरे नसून ‘ते धन आपल्याला देवाच्या कृपेने प्राप्त झाले आहे’, हे लक्षात घेणे आवश्यक असणे : लहानपणापासून आपल्याला काय शिकवलेले असते ? संकटकाळी आपले नातेवाइक, मित्रमंडळी कुणी साहाय्याला येत नाहीत. साहाय्याला येतो तो केवळ पैसा ! ‘आपलेही काहीसे तसेच झाले आहे’, असे वाटते. गेली अनेक वर्षे आपण साधना करत आहोत; परंतु धनाची आसक्ती गेलेली नाही. ती जाण्यासाठी हा प्रयत्न आहे. आतापर्यंत आपण ‘स्वतः कमवलेल्या पैशावर जगत आहोत’, असे म्हणतो; परंतु हे खरे आहे का ?
प.पू. भक्तराज महाराज यांनी एका भजनात म्हटले आहे,
धन मी तुजला जरी अर्पियले ।
कोण दयेने प्राप्त हे झाले ।
अजूनही मजला का न उमजले ।
कसे तुजला अर्पण करू ॥
३ इ. आपले रक्षण होण्यासाठी द्रौपदीप्रमाणे भगवंताला संपूर्ण शरण जाऊया ! : द्रौपदी तिच्या वस्त्रहरणाच्या वेळी सर्व रथी, महारथी यांना, तसेच आपल्या पराक्रमी पतींना रक्षणासाठी याचना करते; परंतु तिला कुणीच साहाय्य करत नाही. त्यानंतर ती भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तरी श्रीकृष्ण येत नाही; कारण तिने लज्जारक्षणासाठी आपला पदर हाताने पकडून ठेवलेला असतो. ज्या क्षणी ती दोन्ही हात वर करून श्रीकृष्णाचा धावा करते, त्या क्षणी भगवंत तिच्या रक्षणासाठी धावून येतो, तसेच आपणही भगवंताला (परात्पर गुरुदेवांना) संपूर्ण शरण जाऊया !
३ ई. भगवान श्रीकृष्णानेही वचन दिले आहे, ‘माझ्या भक्ताचा नाश होऊ शकत नाही आणि जो मला अनन्यभावे शरण येतो, त्याचा योगक्षेम मी वहातो !’ मग आता ‘भगवंत आपला योगक्षेम कसा वहातो ?’, त्याची अनुभूती घेऊया.
३ उ. स्वतःकडून झालेल्या चुकांमुळे लागलेल्या पापांचे परिमार्जन होण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून कदाचित् साधकांना विलासी आणि भोगवादी जीवनापासून दूर गावांमध्ये रहावे लागणार असणे अन् श्रीराम आणि पांडव यांच्याप्रमाणे साधकांना काही वर्षे वनवासात असल्याप्रमाणे रहावे लागणार असू शकणे : आपण काही वर्षांपासून प्रत्यक्ष भगवंताच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहोत. ‘साधनेत जलद प्रगती होण्यासाठी आणि आपल्याकडून होणार्या चुकांचे पापक्षालन होण्यासाठी प्रायश्चित्त घेणे आवश्यक आहे’, ही शिकवण परात्पर गुरुदेवांनी आपल्याला दिली आहे; परंतु आपण आपल्या चुकांमुळे होणार्या पापांच्या तुलनेत प्रायश्चित्त अल्प घेतले अथवा घेतलेच नाही. त्यामुळे या सर्व पापांचा डोंगर झाला आहे. पापक्षालन होण्यासाठी गावाकडे राहून, म्हणजेच विलासी आणि भोगवादी जीवनापासून दूर राहून भोग भोगून संपवायचे आहेत. कदाचित् हे विधिलिखितच असावे. श्रीरामावतारात प्रत्यक्ष भगवंत १४ वर्षे वनवासात राहिला. नंतर श्रीकृष्णावतारात त्याच्या सर्वांत जवळच्या भक्तांना, म्हणजे पांडवांना १३ वर्षे वनवासात रहावे लागून भोग भोगावे लागले आणि आता साधकांना ते भोगायचे आहेत. तेही केवळ ३ – ४ वर्षे, म्हणजे प्रथम प्रत्यक्ष भगवंत, नंतर त्याचे जवळचे भक्त आणि आता साधक ! काय ही लीला आहे बघा ! श्रीराम आणि पांडव यांना आपली सर्व संपत्ती सोडून आहे त्या वस्त्रानिशी वनवासात जावे लागले होते. परात्पर गुरुदेव आपल्याला कुटुंबियांसह आणि संपत्ती हवी असल्यास तिच्यासह गावाकडे जायला सांगत आहेत. प्रायश्चित्त आणखी किती सुलभ करून द्यायचे ?
३ ऊ. गावांकडील सात्त्विक वातावरणात व्यष्टी साधना चांगली होत असणे : गेली अनेक वर्षे शहरांतील रज-तमप्रधान वातावरणात राहून आपली व्यष्टी साधना झालेली नाही. प्रलोभन आणि आकर्षण यांमध्ये अडकून आपले मन आणि बुद्धी यांवर सतत काळे आवरण येत आहे. गावाकडील वातावरण सात्त्विक असल्यामुळे तेथे चांगल्या प्रकारे साधना होऊ शकते. ‘संपत्काळात आपल्याला भगवंताची आठवण किती झाली ? आजही किती होत आहे ?’, याचे चिंतन केल्यास ‘आपत्काळात जेथे चहूकडे आक्रोशच आक्रोश असेल, तेथे भगवंताची आठवण किती वेळा होणार ?’, याचा अभ्यास आपण सर्वांनी करूया.
३ ए. आपल्या पाल्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत करण्यासाठी, तसेच येणार्या आपत्काळात त्यांचे रक्षण होण्यासाठी त्यांना गावाकडे घेऊन जाणे आवश्यक असणे : साधकांनो, हे झाले गेल्या काही वर्षांपासून साधनारत असलेल्यांविषयीचे चिंतन. आता हिंदु राष्ट्र चालवणार्या पुढील पिढीचा विचार करूया. साधकांनो, आपण जे भगवंताकडून शिकलो, ते पुढील पिढीला शिकवणे आपले दायित्व होते; परंतु किती साधकांनी आपल्या पाल्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत केले आहे ? आपण मायेतील आकर्षण आणि प्रलोभन यांच्या भोगात मग्न राहिलो अन् पुढील पिढीलाही त्यांत रमू दिले. भगवंताला आपल्या भक्तांची झालेली अशी दशा कशी आवडेल ? त्यामुळे या पिढीवर हे संस्कार होण्यासह प्रत्यक्षात जीवन जगण्यासाठी, तसेच येणार्या आपत्काळात त्यांचे रक्षण होण्यासाठी त्यांना गावाकडे घेऊन जाणे आवश्यक आहे.
दुसरे म्हणजे आपत्काळात विशेषतः स्त्रियांवर अनेक अत्याचार होतील. (तसा इतिहासच आहे.) मग त्यांच्या रक्षणासाठी हे आवश्यक आहे; कारण ‘शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी ।’, असे संतवचन आहे.
(क्रमशः पुढील रविवारी)
– श्री. मंदार विजय जोशी, बेळगाव, कर्नाटक. (२५.९.२०२०)
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/432906.html
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |