गुरूंनी साधकाचा एकदा धरलेला हात ते जन्मोजन्मी सोडत नाहीत !
‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करणार्या सनातनच्या अनेक साधकांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक होऊन ते जीवन्’मुक्त झाले आहेत. आता त्यांना पुनर्जन्म नाही; कारण मृत्यूनंतर त्यांचा पुढच्या पुढच्या लोकांतून प्रवास होऊन अंती ईश्वरप्राप्ती होईल. तीव्र प्रारब्ध अन् अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या काही साधकांना अशी भीती वाटते, ‘या जन्मात आपण ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी गाठू शकत नाही. त्यामुळे आपला पुढचा जन्मही होणार. पुढच्या जन्मात आपल्याला साधनेला अनुकूल असे वातावरण मिळेल का ? आपल्याला गुरुप्राप्ती होईल का ? आपली आध्यात्मिक प्रगती होईल का ?’ अशा साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात ठेवावेत.
१. वाघाच्या जबड्यात एखादे श्वापद सापडले, तर ते सुटत नाही. तसे गुरूंनी साधकाचा हात एकदा का धरला, तर ते जन्मोजन्मी त्या साधकाचा हात सोडत नाहीत ! यानुसार एखाद्या साधकाला प्रारब्धवशात पुढच्या जन्मी साधनेला अनुकूल अशी परिस्थिती उपलब्ध झाली नाही, तरी गुरु त्या परिस्थितीतही त्याच्यासाठी वाट काढून त्याच्याकडून साधना करवून घेतात. यालाच ‘गुरुकृपा’ असे म्हणतात. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सनातनच्या प्रत्येकच साधकाचा हात घट्ट धरला आहे’, याची साधकांनी निश्चिती बाळगावी.
२. विविध नाडीपट्टयांच्या (नाडीभविष्याच्या) माध्यमातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. असे महान गुरु सनातनच्या साधकांना लाभले असतांना ‘आपला उद्धार होईल कि नाही’, अशी काळजी साधकांनी का करायची ?
३. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ केल्यामुळे गेल्या काही वर्षांतच अनेक साधकांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. अध्यात्मात ५५ टक्के पातळीला शिष्यत्व प्राप्त होते. खरे पहाता ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या सनातनच्या अनेक साधकांमध्ये शिष्यत्वाचे गुणही पूर्णतः नाहीत. असे असतांनाही त्यांची प्रगती झाली, याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा ! यासाठीच नाडीपट्टयांच्या माध्यमातून महर्षि परात्पर गुरु डॉक्टरांचा उल्लेख ‘मोक्षगुरु’ असा करतात. साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवायला हवी. ‘आपले कल्याण व्हावे’, हा सकाम हेतू ठेवून साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवू नये, तर परात्पर गुरु डॉक्टरांवर निष्काम हेतूने श्रद्धा ठेवावी, म्हणजे साधकांचे कल्याण आपोआपच होईल !
४. भक्त प्रल्हादासारखी श्रद्धा, भक्त सुदाम्यासारखी भक्ती, प.पू. भक्तराज महाराजांसारखी गुरुसेवेची तळमळ इत्यादी गुण साधकांनी स्वतःमध्ये निर्माण करायचा प्रयत्न केला, तर त्यांची प्रगतीही निश्चितच होईल.
यासाठी ही भजनपंक्ती परत परत आठवावी –
‘दे हरि गुरुचरणांचा ध्यास । करी मज तव चरणांचा दास ॥’
– (पू.) श्री. संदीप आळशी (४.१२.२०२०)