स्टुटगार्ट (जर्मनी) येथील श्री. पॅट्रिक यांना नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती
१. ‘श्री. पॅट्रिक (स्टुटगार्ट, जर्मनी) यांच्या शरिराची एक बाजू अर्धांगवायूने लुळी पडली आहे. श्री. पॅट्रिक यांना ‘कॅराव्हॅन (अध्यात्मप्रसारासाठी असलेल्या मोठ्या व्हॅन)’मध्ये बसून श्रीकृष्णाचा नामजप ऐकण्यास आणि रिकाम्या खोक्यांचे उपाय करण्यास सांगितले. त्या वेळी श्री. पॅट्रिक जवळजवळ २ घंटे हालचाल न करता सलग बसू शकले.
२. नामजप ऐकत ते ध्यानावस्थेत गेले. याचे त्यांना स्वतःलाच पुष्कळ आश्चर्य वाटले.
३. शरिराच्या ज्या बाजूची हालचाल होत नव्हती, त्या बाजूची थोडी हालचाल होत असल्याचे त्यांना जाणवले.
४. आध्यात्मिक उपायांच्या सत्रात त्यांना पुष्कळ चांगली शक्ती जाणवली.’
– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (२१.८.२०२०)
कलियुगात नामजप करण्याचे महत्त्व
१. कलियुगात सर्वोत्तम साधना, म्हणजे नामजप !
‘नामजप म्हणजे देवाचे नाव पुनःपुन्हा घेत रहाणे, म्हणजेच नामस्मरण करणे. ‘कलियुगात नामजप हीच सर्वोत्तम साधना आहे आणि नामजपाला पर्याय नाही’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे, ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि ।’, म्हणजे ‘यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे.’ नामजपाच्या माध्यमातून योग साधणे, म्हणजे जीव शिवाला जोडणे.
२. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी नामजप करणे, हाच प्रभावी उपाय असणे
आपण कोणतीही व्याधी झाल्यास आपल्या मनाने औषध घेत नाही. त्यासाठी त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीकडे, म्हणजे आधुनिक वैद्यांकडे जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषध घेतो, तसेच भवसागरात अडकण्याच्या मोठ्या रोगातून बरे होण्यासाठी, म्हणजेच आपली आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करणे आवश्यक असते. हल्ली समाजातील जवळजवळ प्रत्येकालाच काही ना काही प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास असतो. वाईट शक्तींमुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास होतात, तसेच जीवनात इतर अडचणीही येतात. वाईट शक्ती साधकांच्या साधनेत अडथळेही आणतात; पण दुर्दैवाने बहुतेक जण वाईट शक्तींच्या त्रासांविषयी अनभिज्ञ असतात. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी ‘नामजप’ ही साधना करणे, हाच प्रभावी उपाय आहे, तसेच देवतांचा नामजप भावपूर्ण केल्यास त्यातून प्रारब्ध सहजतेने भोगून त्यातून बाहेर पडण्यास साहाय्य होते.
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
|