रूपी अधिकोषातील खातेदारांची १ सहस्र १४६ कोटी रुपये परत मिळावेत यासाठी उच्च न्यायालयात धाव !
पुणे – रूपी अधिकोषातील ६ लाख २२ सहस्र गुंतवणूकदारांनी पैसे मिळावेत म्हणून वर्ष २०१३ पासून लढा उभारला आहे. ठेवीदारांच्या आर्थिक अडचणींचा विचार करता रूपी अधिकोषाच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेतील १ सहस्र १४६ कोटी रुपये परत मिळावेत म्हणून गुंतवणूकदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही रक्कम वर्ष २०१३ पासून ७ टक्के व्याजाने मिळावी, अशी मागणी करणारी याचिका गुंतवणूकदारांची संघटना असलेल्या ग्रुप ऑफ पीपल वर्क यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.
रक्कम वर्ष २०१३ पासून अडकून पडल्याने गुंतवणूकदारांची आर्थिक कोंडी झाली असल्याचे गुंतवणूकदार संघटनेचे प्रमुख धनंजय कानझोडे आणि शेखर जाधव यांनी सांगितले. अधिकोष डबघाईला आल्याने तिचे दुसर्या अधिकोषात विलीनीकरण करावे यासाठी २० अधिकोषांशी चर्चा झाली आहे; परंतु रूपी अधिकोषावरील प्रशासक सुधीर पंडित हे गुंतवणूकदारांचे हित न पहाता परस्पर व्यवहार करत आहेत, असे कानझोडे यांनी सांगितले.