कोल्हापूर येथे मुलाच्या वाढदिवसानिमित्त विनाअनुमती क्रिकेट स्पर्धा भरवून चिअर गर्ल्स नाचवल्या ; दोघांवर गुन्हा नोंद
समाजाची ढासळलेली नितीमत्ता !
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील पाटीलवाडी येथे रघुनाथ पाटील यांनी त्यांचा मुलगा भैरवनाथ याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनाअनुमती क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. यातील सामन्यात रंगत यावी म्हणून चिअर गर्ल्स आणल्या. त्यांना पहाण्यासाठी गावातील तरुणांची मोठी गर्दी झाली. सामने चालू होताच मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणेवर या चिअर गर्ल्स नाचू लागल्या आणि त्यांच्या समवेत गावातील काही तरुणही नाचू लागले. हा प्रकार ४ घंटे चालू होता. ही गोष्ट पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. पोलिसांनी पहाताच उपस्थित सर्वांनी पळ काढला. या प्रकरणी भैरवनाथ पाटील आणि रघुनाथ पाटील या दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (विनाअनुमती क्रिकेट स्पर्धा घेणे आणि त्यात चिअर गर्ल्स आणून नाचवणे यातून समाजाची नितीमत्ता किती ढासळली आहे हेच लक्षात येते. याचप्रकारे कोरोनाचे संकट अल्प झालेले नसतांना गर्दीमुळे कोरोनाचा संसर्गही वाढू शकतो. त्यामुळे असा प्रकार करणार्यांना कठोर शिक्षा झाली, तरच पुढील वेळेस अशी अयोग्य कृती करण्यास कुणी धजावणार नाही ! – संपादक)