कोरोना लसीकरणाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्या ! – आमदार नीतेश राणे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
कणकवली – देशात डिसेंबरअखेर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
कोरोनाची लस सार्वजनिकरित्या देशात वितरित केली जाणार आहे. ही मोहीम शासकीय यंत्रणेद्वारे राबवण्यात येणार आहे का, याविषयी लोकप्रतिनिधींनाही माहिती नाही. या मोहिमेचे नियोजन आणि निकष काय असतील, याची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे. विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबवण्यात सिंधुदुर्ग जिल्हा पूर्वीपासूनच प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेतही ही परंपरा कायम राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन या पत्राद्वारे आमदार राणे यांनी केले आहे.