ऊस वाहतूकदार टोळी मुकादमांवर गुन्हे नोंद करा ! – आमदार प्रकाश आबिटकर
कोल्हापूर – जिल्ह्यामध्ये ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन असल्याने ऊसतोडीसाठी मराठवाडा आणि विदर्भातील ऊस मजूर मुकादम यांच्याकडून जिल्ह्यातील ऊस वाहतुकदार मालकांची प्रतिवर्षी लाखो रुपयांची फसवणूक होते. त्यामुळे या टोळी मुकादमांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन केली.
या वेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, टोळी मिळावी याकरिता संबंधित वाहतूकदार मुकादमांचा शोध घेण्याकरिता बीड, धाराशीव, परभणी, हिंगोली अशा विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये गेले असता टोळी मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांना मारहाण करणे, अपहरणाचे खोटे गुन्हे नोंद करणे, वेळप्रसंगी जिवे मारण्याचासुद्धा प्रयत्न मुकादम आणि टोळ्याकंडून होतो. यामुळे ऊस वाहतूकदारांची प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असल्यानेे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांवर आत्महत्या करण्याची वेळी आली आहे. फसवणूक झाल्याने काही कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
याविषयी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक ही गोष्ट गंभीर स्वरूपाची असून पोलीस प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. ज्या ऊस वाहतूकदारांची फसवणूक झाली अशा निवडक वाहतूकदारांचे टोळी मुकादमांशी झालेले करार-नोटर्या कोल्हापूर जिल्ह्यात झाल्या आहेत आणि त्यांचे पैसे ऑनलाईन बँकींगच्या माध्यमातून पाठवले आहेत, अशा तक्रारी घेऊन पहिल्या टप्यात या कागदपत्रांच्या अनुषंगाने गुन्हे नोंद करण्यात येतील.
या वेळी सरंपच धनाजी खोत, सर्जेराव पाटील, ऊस वाहतूकदार संघटनेचे सदाशिव चव्हाण, विक्रम पाटील, वसंत प्रभावळे, अनिल हळदकर, कृष्णात राजिगरे, रघुनाथ सारंग, यांच्यासह राधानगरी-भुदरगड तालुक्यातील ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.