लहानपणापासूनच देवभक्ती करणार्या, सोशिक आणि इतरांना साहाय्य करणार्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर !
कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी (१२.१२.२०२०) या दिवशी सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा आणि सून यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. हलाखीच्या परिस्थिती असूनही देवावर श्रद्धा ठेवल्याने परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आध्यात्मिक उन्नती होणे
१ अ. बालपणीची हलाखीची स्थिती : ‘माझी आई सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांचा जन्म अंकोला (कर्नाटक) येथे झाला. त्यांना ३ भाऊ आणि ६ बहिणी आहेत. त्या भावंडांत सर्वांत मोठ्या आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांच्या माहेरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांच्या वडिलांचे एक लहानसे उपाहारगृह होते. त्या अभ्यासात हुशार असूनही परिस्थितीमुळे अन् पाठीमागे लहान भावंडे असल्यामुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही. त्यानंतर त्यांना एक लहानशी नोकरी मिळाली. त्यांना ४० रुपये वेतन मिळायचे. त्या दुसरीकडे रहात असल्यामुळे त्या वेतनातील १५ रुपये स्वखर्चासाठी ठेवायच्या आणि शेष पैसे आईकडे पाठवायच्या. त्या शिवणकलेतही पारंगत आहेत. त्या लहान भावंडासाठी हाताने कपडे शिवायच्या.
१ आ. लग्नानंतर अत्यल्प पैशात घरखर्च चालवणे : त्यांचे लग्न वर्ष १९६६ मध्ये झाले. माझे बाबा सावर्डे येथे एका साध्या आस्थापनात नोकरी करायचे. त्या वेळी बाबांना ८० रुपये वेतन मिळायचे. सद्गुरु आई त्याच पैशांत संसार चालवायच्या. आम्हा भावडांचा जन्म झाल्यावर (आम्ही १ बहीण आणि २ भाऊ, अशी ३ भावंडे आहोत.) बाबांना ४०० रुपये वेतन मिळू लागले. सद्गुरु आईने कसलीच तक्रार न करता त्या पैशात संसार चालवला. आम्ही लहान असतांना माझ्या बाबांची नोकरी गेली. आमची परिस्थिती अजून बिकट झाली. सद्गुरु आईंचा साईबाबा आणि कुलदेवी शांतादुर्गा यांच्यावर दृढ विश्वास होता. माझे मामा आणि मावशी यांनी या प्रसंगी आम्हाला पुष्कळ साहाय्य केले आणि त्यामुळेच आम्ही शिक्षण घेऊ शकलो. आधी आम्ही सावर्डे येथे रहात होतो. नंतर आम्ही कवळे (फोंडा) येथे रहायला आलो. बाबांचे शिक्षण अल्प असल्याने आणि ते साधे असल्याने त्यांना कुठे नोकरी मिळाली नाही. ते घरी बसून चिडचिड करायचे. सद्गुरु आई पूर्वीपासून शांत आणि सहनशील असल्याने त्या निमूटपणे सर्व सहन करायच्या. त्यांना ब्राह्मण लोकांकडे सुवासिनी म्हणून बोलवायचे. तेथे त्यांना थोडे पैसे मिळायचे. ते त्या संसारासाठी वापरायच्या. माझा मामा आणि मावशी यांच्याकडून मिळालेल्या पैशातील काही पैसे त्यांनी अधिकोषात ठेवले होते. त्यांनी स्वतःसाठी कधीच पैसे व्यय केले नाही. त्या असेल त्या परिस्थितीत समाधानी असायच्या.
१ इ. साईबाबांवर अतूट श्रद्धा ठेवून घराशेजारील साईबाबांच्या मंदिरात प्रतिदिन सेवा करणे आणि मुले आजारी पडल्यावर साईबाबांनी सूक्ष्मातून कोर्या कागदावर उपाय आपोआप लिहिले जाण्याची अनुभूती येणे : आम्ही सावर्डे येथे रहात असतांना आमच्या घराशेजारी साईबाबांचे लहान मंदिर होते. तेथे सद्गुरु आई नियमितपणे ‘केर काढणे, लादी पुसणे, रांगोळी काढणे’, अशा सेवा करायच्या. त्या आम्हालाही नियमित मंदिरात घेऊन जायच्या. त्यांची साईबाबांवर अतूट श्रद्धा होती आणि प्रत्येक कठीण प्रसंगात (आम्ही आजारी पडलो, तर) त्या साईबाबांना सूक्ष्मातून विचारायच्या. त्या वेळी ते तिला कागद घ्यायला सांगायचे. सद्गुरु आईंनी त्यावर पेन धरले की, आपोआपच उपाय कागदावर लिहिले जायचे. सद्गुरु आई त्याप्रमाणे आम्हाला घरगुती औषधे द्यायच्या आणि आम्हाला गुणही यायचा. ‘साईबाबांनी प्रत्येक संकटातून मला बाहेर काढले’, असा त्यांचा दृढ विश्वास आहे.
१ ई. कुलदेवी शांतादुर्गादेवीची मनापासून सेवा आणि भक्ती केल्याने देवीचे अनेक साक्षात्कार होणे : सद्गुरु आईंनी कवळे येथे आल्यावर कुलदेवी शांतादुर्गा हिची मनापासून सेवा आणि भक्ती केली. त्या प्रत्येक पंचमीला सकाळी उठून आम्हाला अल्पाहार बनवून ठेवायच्या आणि स्वतः न खाता मंदिरात जाऊन देवीला अभिषेक करायच्या. त्यांची देवीवर पुष्कळ श्रद्धा अन् भक्ती होती. त्यांना देवीचे पुष्कळ साक्षात्कार व्हायचे. सद्गुरु आईंच्या स्वप्नात देवी येऊन एखादी वस्तू मागायची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तशीच वस्तू दुसरा कुणीतरी आणून द्यायचा. आमच्याकडे ज्या वेळी पैसे नसायचे, त्या वेळी सद्गुरु आईंना ब्राह्मणाकडे सुवासिनी म्हणून बोलवायचे किंवा दुसर्या कुणाकडून अनपेक्षित साहाय्य व्हायचे.
१ उ. मोठा भाऊ मनोज नोकरीसाठी मुंबईला जाणे आणि त्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला आरंभ करणे : माझा मोठा भाऊ मनोज त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी मुंबईला गेला. तो आम्हाला नियमितपणे प्रत्येक मासाला पैसे पाठवायचा. नंतर तो नोकरी सोडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छत्रछायेखाली साधना करू लागला. पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर अभ्यासवर्ग घेण्यासाठी फोंड्याला यायचे. तेव्हा ते आमच्या घरी आले होते.
१ ऊ. सद्गुरु आईने गुरुकृपायोगानुसार साधना चालू केल्यावर देवीने गुरूंची सेवा करायला सांगणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी आईची सद्गुरुपदापर्यंत आध्यात्मिक उन्नती करवून घेणे : त्यानंतर सद्गुरु आईंची साधना चालू झाली. त्यांचा नामजपही पुष्कळ व्हायला लागला. नंतर एक दिवस देवीने दृष्टांत देऊन सद्गुरु आईंना सांगितले, ‘आता माझी सेवा बस झाली. आता तू तुझ्या गुरूंची सेवा कर आणि ते सांगतील तसे साधनेचे प्रयत्न कर.’ परात्पर गुरु डॉक्टरांनी सद्गुरु आईंकडून साधना करून घेतली आणि त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले.
२. अन्य गुणवैशिष्ट्ये
२ अ. स्वावलंबी : पूर्वी सद्गुरु आईंना पुष्कळ त्रास व्हायचा; पण त्यांनी कधीही बोलून दाखवले नाही. त्यांनी घरकामात सवलत घेतली नाही. त्या आताही स्वतःचे काम स्वतः करतात आणि कधीही आमच्याकडून सेवा करून घेत नाहीत. त्या नेहमी म्हणतात, ‘‘माझे करण्यात कुणाचाही वेळ वाया जाऊ नये आणि माझ्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये.’’
२ आ. आदरातिथ्य करणे : आमची परिस्थिती हलाखीची होती. आम्हाला दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण होते. सद्गुरु आई अशा परिस्थितीतही घरी येणार्या प्रत्येक व्यक्तीला चहा किंवा जेवण द्यायच्या.
२ इ. कष्टाळू : त्यांनी संसारासाठी आणि आमच्या शिक्षणासाठी पुष्कळ कष्ट घेतले. आमच्या शाळेत काही असल्यास किंवा पालकांना बोलावले असल्यास आम्ही सद्गुरु आईंना शाळेत घेऊन जायचो; कारण बाबा साधे होते. ‘आमचे शिक्षण पूर्ण होण्यात पैशांची उणीव भासू नये आणि मला कसलाच त्रास होऊ नये’, यासाठी कार्यालयात जाऊन सद्गुरु आईंनी मला शिष्यवृत्ती मिळवून दिली.
२ ई. सर्वांशी जुळवून घेणे आणि इतरांना साहाय्य करणे
अ. त्या पूर्वीपासून शांत आणि प्रेमळ आहेत. त्यांनी घरातील सर्वांशी जुळवून घेतले. त्या शेजारी करंज्या, मोदक, तसेच पापड करायला जायच्या. त्या वेळी त्यांना आर्थिक साहाय्य व्हायचे नाही, तरीही त्यांनी कुणालाही ‘नाही’ म्हटले नाही.
आ. आम्हाला काका आणि काकू यांच्याकडून वाईट वागणूक मिळाली. काकूच्या शेवटच्या आजारपणात तिच्या मुलांनी तिला सांभाळले नाही. त्या वेळी काकू अंथरूणावर असतांना सद्गुरु आईंनी तिची ८ मास सेवा केली.
२ उ. विचारण्याची आणि शिकण्याची वृत्ती : त्यांना या वयातही सर्वकाही जाणून घेण्याची इच्छा आहे. आम्हाला घरी सेवेसाठी संगणक मिळाल्यावर सद्गुरु आईंनी ‘सीपीयू’ आणि ‘यूपीएस’ यांचे महत्त्व विचारून घेतले.
२ ऊ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उच्च कोटीचा भाव : परात्पर गुरु डॉक्टरांचे नाव जरी उच्चारले, तरी सद्गुरु आईंची भावजागृती होते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्यावर पुष्कळ उपकार केले आहेत आणि ते आमच्या सर्व कुटुंबाची काळजी घेणारच आहेत’, असा त्यांचा भाव आहे.
‘परात्पर गुरुदेवा, तुम्हीच मला ही सूत्रे सुचवली आणि लिहून घेतली’, त्याविषयी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. नागराज कुवेलकर (धाकटा मुलगा), कवळे, फोंडा, गोवा. (२३.१०.२०२०)
देवाकडे काहीही मागू नये आणि आहे त्याच्यातच समाधानी रहावे
देवाकडून कुठलीही आर्थिक अपेक्षा करू नये. आपल्या नशिबात त्रास असतील, तर त्रास सहन करण्यासाठी शक्ती मागावी.
– (सद्गुरु) श्रीमती प्रेमा कुवेलकर
सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांनी केलेले मार्गदर्शन
१. इतरांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव ठेवावी
आमच्या कठीण प्रसंगात मामा आणि मावशी यांच्याकडून आम्हाला पुष्कळ आधार मिळाला, तसेच दूरचे नातलग आणि समाजातील काही लोक यांच्याकडून प्रासंगिक साहाय्य मिळाले. सद्गुरु आई आम्हाला नेहमी सांगतात, ‘त्यांनी केलेल्या उपकाराची आठवण ठेवावी.’’
२. दुसर्यांना कधीही दुखवू नये
इतरांशी बोलतांना आणि वागतांना संयम ठेवावा. ‘इतर दुखावले जातील’, असे आपण वागू नये. ‘आपण गरिबीतून मोठे झालो आहोत’, याचे सदैव भान असावे.
३. कुठल्याही प्रसंगात देवावरचा विश्वास डगमगू देता कामा नये
कुलदेवी ही आपली आई आहे. ‘तिने आपल्याला प्रत्येक कठीण प्रसंगात तारले आहे’, याविषयी सद्गुरु आई आम्हाला सांगतात. काही वेळा माझे महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी घरात पैसे नसायचे. त्या वेळी कुणाकडून तरी घरात पैसे यायचे.
४. स्वतःची तुलना श्रीमंत व्यक्तीशी करू नये
आपण कधीही आपली तुलना आपल्यापेक्षा वरच्या (श्रीमंत) माणसाशी करू नये. तुलना करायचीच असेल, तर आपल्यापेक्षा गरीब माणसाशी करावी. ज्या माणसाकडे गाडी आहे, बंगला आहे, त्याची आपल्याशी तुलना करू नये. असे केल्यामुळे आपल्याला दुःख होते; कारण आपल्याकडे ते नाही.
५. कुलदेवीला सांगून नवीन वस्तू घेतली, तर ती चांगली टिकते
‘कुलदेवीला सांगून एखादी वस्तू घेतली, तर ती चांगली रहाते’, अशी तिची श्रद्धा आहे. मी महाविद्यालयात शिकत असतांना नवीन घड्याळ घेतले होते. मी नवीन घड्याळ घरी आणून हातात बांधल्यावर ते काही वेळाने बंद पडले. नंतर मी देवीकडे क्षमा मागितली, ‘मला क्षमा कर आणि माझे घड्याळ व्यवस्थित चालू दे.’ थोड्या वेळाने घड्याळ परत चालू झाले. ‘देवीला सांगितल्याविना कोणतीही वस्तू घरात आणू नये’, हे माझ्या लक्षात आले.’
– श्री. नागराज कुवेलकर (धाकटा मुलगा), कवळे, फोंडा, गोवा. (२३.१०.२०२०)
सुनेची मुलीप्रमाणे काळजी घेणार्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर !
१. शांत
‘घरात कुणाचे काही चुकल्यास सद्गुरु आई न रागावता त्यांना शांतपणे चूक समजावून सांगतात. सद्गुरु आईंनी सांगितलेले दुसर्यांना पटते. सद्गुरु आई आजपर्यंत कधीच मोठ्या आवाजात बोलल्या नाहीत.
२. सुनेला आईचे प्रेम देणे
सद्गुरु आई माझ्यावर मातेसमान प्रेम करतात. त्यांनी आजपर्यंत मला कधीच वाईट वागणूक दिली नाही. पूर्वी मला अल्पाहाराचे काही पदार्थ येत नव्हते. सद्गुरु आईंनी मला ते पदार्थ करायला शिकवले. आम्हाला मूलबाळ नसले, तरी त्यांनी आम्हाला त्याची कधीच जाणीव करून दिली नाही.
३. सुनेच्या आजारपणात तिची सेवा करणे
माझे हात आणि पाय यांवर गाठी यायच्या. त्या वेळी सद्गुरु आई गरम पाण्यात कापड भिजवून त्या कापडाने माझे हात आणि पाय शेकायच्या अन् नंतर त्या भागावर तेलाने मर्दन करायच्या.
मी कधी रुग्णाइत झाल्यास त्यांना पुष्कळ वाईट वाटते. त्या देवीकडे ‘सून लवकर बरी होऊ दे’, अशी प्रार्थना करतात. मी रुग्णाइत असतांना त्या माझ्यावर घरगुती उपाय करायच्या आणि देवीचा अंगारा लावायच्या.
४. भाव
अ. सद्गुरु आईंना घरात बसल्या जागी देवतांची दर्शने होतात आणि देवता त्यांच्याशी बोलतात.
आ. ‘देव आणि परात्पर गुरु डॉक्टर सर्व व्यवस्थित करतील. आपण नकारात्मक विचार करू नये’, असे त्या सांगतात. त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा आहे.
इ. आम्हाला काही त्रास झाल्यास आम्ही सद्गुरु आईंना ‘सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांना विचारा’, असे सांगतो. त्या सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांना विचारून आम्हाला सांगतात.’
– सौ. रूपा कुवेलकर (सून)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |