गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी ! – ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा

रामचंद्र गुहा हे साम्यवादी विचारसरणीचे इतिहासकार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी गांधी कुटुंबाविषयी केेलेल्या विधानाला नक्कीच महत्त्व आहे !

नवी देहली – गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी, असे मत लेखक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या ‘एन्.डी.टी.व्ही.’ वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये मांडले आहे. तसेच ‘सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस कधीच भाजपला पर्याय म्हणून पुढे येऊ शकत नाही’, असे परखड मतही मांडले आहे. ‘गांधींनी आता जाणे आवश्यक का आहे ?’ या मथळ्याखाली गुहा यांनी हा लेख लिहिला आहे.

गुहा यांनी त्यांच्या लेखात मांडलेली सूत्रे

१. पंतप्रमान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा हे भाजपचे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. या तिघांनाही राजकारण हे वारसा म्हणून मिळालेले नाही. या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची शक्ती असून सध्या ते तेच करत आहेत.

२. दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते वैचारिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले दिसत नाहीत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा  काँग्रेसचे सर्वांत मोठे नेते आहेत; कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे.

३. बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये राहुल गांधी सुट्ट्यंसाठी निघून गेले होते. ते निवडणुकीविषयी गंभीर नव्हते. काँग्रेसच्या उलट भाजपने निवडणूक जिंकल्यानंतर लगेच अध्यक्ष नड्डा यांनी अशा ठिकाणी दौरा करण्याची घोषणा केली जिथे पक्षाने वाईट कामगिरी केली आहे.

४. मी ज्या काँग्रेसचा समर्थक होतो ती म. गांधी यांची काँग्रेस आहे. त्या काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवू देत देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांची जोपासना करण्याला प्राधान्य दिले होते; मात्र आज काँग्रेस स्वत:ला ‘स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष पक्ष’ म्हणवते आणि दुसरीकडे मवाळ हिंदुत्वाचे धोरण अवलंबतांना दिसते.

५. काँग्रेस एकीकडे ‘उदारमतवादी’ असल्याचे सांगत त्याचे श्रेय घेते, तर दुसर्‍या दिवशी ती उद्योजकांना विरोध करतांना दिसते.

६. काँग्रेस आणि भाजप यांच्या नेतृत्वामध्ये ३ सूत्रांवरून पुष्कळ मोठा भेद लक्षात येतो. भाजपचे नेतृत्व हे ‘सेल्फ मेड’ म्हणजेच स्वत: घडवलेले नेतृत्व आहे. ते वैचारिक स्तरावर एका पातळीवर आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही मोठ्या कुटुंबातून आलेले नाही.

७. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी अजूनही ३ वर्षे शेष आहेत. या कालावधीमध्ये काँग्रेसने स्वत:ला पुन्हा उभे केले पाहिजे. भविष्यातील नेतृत्व पक्षबांधणीच्या माध्यमातून समोर आणले पाहिजे. इतर विरोधी पक्षांना एकत्र घेऊन आघाडी स्थापन करून कणखर पर्याय निर्माण केला पाहिजे.