एका विवाह सोहळ्यामुळे गोव्यात १०० जण कोरोनाबाधित

मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन करा ! – डॉ. शिवानंद बांदेकर, डिन, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

पणजी, १० डिसेंबर (वार्ता.) – गोव्यात एका विवाह सोहळ्यामुळे १०० जण कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन करावे, असे आवाहन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डिन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केले.

अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर पुढे म्हणाले, ‘‘राज्यात आता पुन्हा प्रतिदिन १०० ते २०० जणांना नव्याने कोरोनाचा संसर्ग होत आहे. हा प्रकार असाच चालू राहिल्यास राज्यातील रुग्णालये पुन्हा रुग्णांनी भरून जातील. कोरोना महामारीमुळे मागील ९ मासांत शैक्षणिक, आर्थिक आदी सर्वच स्तरांवर प्रत्येकाला फटका बसलेला आहे. लोकांनी योग्य सावधगिरी बाळगून राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. लोक आता कोरोना महामारीकडे दुर्लक्ष करू लागले आहेत आणि कोरोनाचा संसर्ग झाल्याने आलेल्या तापाला सर्दीपडश्याचा ताप असे गृहित धरून वागत आहेत. कोरोना महामारी अजूनही गेलेली नाही. लग्न समारंभाचे किंवा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करता येऊ शकते; मात्र या वेळी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आणि गर्दी टाळणे हे सावधगिरीचे उपाय केलेच पाहिजेत.’’

कुडचडे येथील उच्चमाध्यमिक विद्यालयाचा १२ वी इयत्तेतील विद्यार्थी कोरोनाबाधित

कुडचडे – येथील उच्चमाध्यमिक विद्यालयाचा १२ वी इयत्तेतील एक विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला आहे. राज्यात २१ नोव्हेंबरपासून इयत्ता १० वी आणि १२ वीच्या नियमित वर्गांना प्रारंभ झाल्यापासून विद्यालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची ही राज्यातील तिसरी घटना आहे. यापूर्वी उसगाव आणि कुजिरा, बांबोळी संकुलातील प्रत्येकी १ शिक्षक कोरोनाबाधित आढळला आहे.

मडगाव येथील ई.एस्.आय. कोरोना रुग्णालय रुग्णांच्या अभावी रिक्त

मडगाव येथील ई.एस्.आय. कोरोना रुग्णालय हे रुग्णांच्या अभावी आता रिक्त झाले आहे. या ठिकाणी फोंडा येथील ६८ वर्षीय गंभीर स्थितीत असलेल्या एका पुरुष रुग्णाचे १८ दिवस उपचार घेतल्यानंतर नुकतेच निधन झाले आणि यानंतर रुग्णांच्या अभावी रुग्णालय रिक्त झाले आहे. राज्यात कोरोना महामारीचा कहर असतांना या रुग्णालयात एकाच वेळी २१० रुग्णांवर उपचार केले जात होते. कोरोना महामारीच्या काळात या ठिकाणी १६ मार्चपासून २ सहस्र ६०० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. हे रुग्णालय लवकरच ई.एस्.आय. ला नियमित उपचारासाठी (कोरोनाची लागण न झालेल्या रुग्णांसाठी) सुपुर्द करण्यात येणार असल्याचे समजते.