कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी तातडीने समित्या स्थापन करा ! – मंगेश जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – राज्यशासनाकडून कोरोना लसीकरणाची मोहीम लवकरच चालू करण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने समित्या स्थापन कराव्यात, असा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयीची आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी जोशी बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मंगेश जोशी पुढे म्हणाले की, कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी आरोग्ययंत्रणेने लाभार्थ्यांची सूची तातडीने सिद्ध करण्याचे काम करावे. यासाठी ‘डाटा एंट्री ऑपरेटर’ची नियुक्ती करावी. लस साठवण्यासाठी ‘डीप फ्रिजर’ यांची पहाणी करून देखभाल आणि आवश्यक असल्यास दुरुस्त्या तातडीने कराव्यात. लस वाहतुकीसाठी वाहनांचे नियोजन करावे. वाहनांची संख्या अल्प पडत असल्यास वाहन भाड्याने घेण्याची प्रक्रिया तात्काळ राबवावी. शासनस्तरावरून लसीकरणाच्या कार्यवाहीसाठी रूपरेषा आणि मार्गदर्शक सूचना सिद्ध करण्याची कार्यवाही चालू आहे. या सूचना प्राप्त होताच त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.
लसीकरणासाठी कॅम्पचे आयोजन
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर या वेळी म्हणाले की, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ज्या ठिकाणी ‘कॅम्प’चे आयोजन करण्यात येणार आहे, त्यासंबंधीच्या भूमी तातडीने निश्चित कराव्यात. लस देण्यासाठी कर्मचार्यांच्या प्रशिक्षण शिबिरांचे तातडीने आयोजन करण्यात यावे. लस देण्यासाठी सुरक्षाविषयी सामुग्रीची सूची सिद्ध करून मागणी संबंधित यंत्रणांकडे पाठवावी. आरोग्ययंत्रणेत काम करणार्यांना ही लस प्राधान्याने देण्यात येणार असल्याने आरोग्ययंत्रणेतील कर्मचार्यांची नोंदणी चालू करावी.