जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
पणजी, १० डिसेंबर – १२ डिसेंबर या दिवशी होणार्या जि.पं. निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. राज्यातील ४८ मधील ४१ जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांना योग्य आणि अयोग्य काय याची माहिती द्यावी. कोरोना महामारीच्या काळात शासनाने केलेली चांगली कामगिरी लोकांपर्यंत पोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
कोरोना महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे जिल्हा पंचायतीची मतमोजणी दुसर्या दिवशीपर्यंत चालू रहाण्याची शक्यता
महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे जिल्हा पंचायतीची मतमोजणी दुसर्या दिवशीपर्यंत चालू रहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जि.पं.साठी १२ डिसेंबर या दिवशी मतदान होणार आहे, तर १४ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. ही मतमोजणी १४ डिसेंबरला मध्यरात्रीनंतरही चालू रहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्याचा निकाल १४ डिसेंबर या दिवशी दुपारपर्यंत येऊ शकणार; मात्र सामाजिक अंतर पाळणे, सभागृहाचे निर्जंतुकीकरण करणे आदींमुळे मतमोजणीला विलंब होणार आहे. या मतदानासाठी १ सहस्र १८७ मतदान केंद्रांवर एकूण ९ सहस्र ५०० कर्मचारी कार्यरत असतील.