३५ सहस्र कोटी रुपयांचा खाण घोटाळा झालेला असल्यास संबंधित लोकलेखा समितीचा अहवाल प्रसिद्ध करा ! – काँग्रेस

गोव्यात खाण घोटाळा झाल्याचे कोणत्याही राजकीय पक्षाने नव्हे, तर निवृत्त न्यायमूर्ती शहा यांच्या नेतृत्वाखालील समितीने घोषित केले होते. त्यामुळे या घोटाळ्याचे राजकारण नव्हे, तर त्यातील गुन्हेगारांवर कारवाई होणे अपेक्षित आहे !

पणजी, १० डिसेंबर (वार्ता.) – ३५ सहस्र कोटी रुपयांचा खाण घोटाळा झालेला असल्यास संबंधित लोकलेखा समितीचा अहवाल प्रसिद्ध करावा, असे आवाहन गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले आहे.

भाजपने वर्ष २००९-१० मध्ये ३५ सहस्र कोटी रुपयांचा खाण घोटाळा झाल्याचा आरोप करून काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे वर्ष २०१२ मध्ये काँग्रेसचे सरकार पायउतार झाले होते. आता भाजप ३५ सहस्र कोटी रुपयांचा खाण घोटाळा झाला नसल्याचे सांगत आहे. या पार्श्‍वभूमीवर गिरीश चोडणकर यांनी हे आवाहन केले.