पंढरपूर पालखी मार्गावरील वाखरी येथील प्राचीन बाजीराव विहीर जतन करण्यास यश !
|
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंढरपूर-पुणे पालखी महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग करण्याचे काम चालू आहे. हे काम करतांना वाखरी-भंडीशेगाव दरम्यान असलेल्या बाजीराव विहिरीचा अडथळा येत असल्याने ती बुजवण्याचे काम चालू होते. ही विहीर ऐतिहासिक असल्याने ती बुजवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. याविषयी इतिहास संशोधक आणि मोडी लिपी तज्ञ राज मोमणे यांना माहिती मिळताच त्यांनी पुणे येथील पुरातत्व विभागाशी संपर्क साधून पुरावे दिले. त्यामुळे पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक वि.पुं. वाहणे यांनी विहीर न बुजवण्याविषयी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र पाठवले आहे. बाजीराव विहीरीच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनी सव्हिर्र्स रोड कमी करणे आणि सव्हिर्र्स रोड वळवणे, असे दोन प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवले आहेत. त्यामुळे बाजीराव विहीर नामषेश होणार नसल्याचे पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पालखी मार्गावरून येतात. या पालखी सोहळ्यातील सहस्रो भाविकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी अनुमाने २०० वर्षांपूर्वी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी विहीर बांधली. या विहीरीजवळ श्री विठ्ठलास तुळस प्रिय असल्याने तुळस आणि फुलांची झाडे लावण्यात आली होती. सध्या या विहीरीजवळ आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळे पंढरपूरकडे येतांना गोल आणि उभे रिंगण करतात, तसेच काही वेळ विश्रांतीही घेतात.
स्थानिकांनी केलेल्या संघटित विरोधामुळे प्राचीन विहीरीचे होणार जतन !
१. वाखरी ग्रामस्थ, धनगर समाज, बंडी शेगाव येथील ग्रामस्थ यांना विहीर पाडण्याविषयी कळल्यानंतर त्यांनी आंदोलन करून महामार्गाचे काम बंद पाडले.
२. पंढरपूर येथील महाद्वारातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाड्याचे व्यवस्थापक आणि माजी नगरसेवक श्री. आदित्य फत्तेपुरकर आणि त्यांचे सहकारी यांनी तातडीने पालकमंत्री भरणे यांना दूरभाष करून याविषयी माहिती दिली, त्यानंतर त्वरित पालकमंत्री भरणे यांनी प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना काम थांबवण्याचे आदेश देऊन या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले.
३. राष्ट्रीय समाज पक्षाचे पंकज देवकाते, संजय लावते, म्हाळाप्पा खांडेकर, शरदचंद्र पांढरे यांनी प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन विहीर पाडण्यात येऊ नये, अन्यथा मोठे आंदोलन करण्याची चेतावणी दिली होती.