कुपवाड तलाठी कार्यालयातील तक्रारींचे निवारण न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकू ! – भाजपचे अपर तहसीलदारांना निवेदन
प्रशासनाचा भोंगळ कारभार ! कार्यालयात कामे प्रलंबित का रहातात, तसेच प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे नियोजन का केले जात नाही ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ? यासाठी निवेदन का द्यावे लागते ?
सांगली – कुपवाड तलाठी कार्यालयामध्ये बर्याच वर्षांपासून काही नोंदी प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांना दाखले किंवा नागरिकांना आवश्यक असलेले फेरफार, ७/१२ उतारे आणि इतर दाखले वेळेत मिळत नाहीत. संबंधित तलाठी कार्यालयामध्ये नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित नसतात. उपस्थित असलेले तेथील कोतवाल आणि कर्मचारी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून उद्धटपणाची उत्तरे दिली जातात. येथे येणार्या नागरिकांना उद्धटपणे बोलणे, माहिती न देणे अशा प्रकारचे वर्तन संबंधित कर्मचार्यांकडून वारंवार होते. तरी या सर्व तक्रारींचे निवारण ८ दिवसांत न झाल्यास कुपवाड तलाठी कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असे निवेदन कुपवाड शहर भाजपच्या वतीने अपर तहसीलदारांना देण्यात आले. (वास्तविक जनतेच्या कररूपातून मिळालेल्या पैशातूनच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना वेतन मिळते. असे असतांना जनतेच्या किमान समस्यांची नोंद घेणे हे प्रत्येक प्रशासकीय कार्यालयाचे कर्तव्यच आहे ! आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार न पाडणार्या प्रत्येक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाईच अपेक्षित आहे ! – संपादक)
अपर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तलाठी किंवा संबंधित कर्मचारी यांचे भ्रमणभाष क्रमांक येथील कार्यालयामध्ये उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना उपस्थितीविषयी माहिती होत नसल्यामुळे दिवसभर नागरिक, विद्यार्थी आणि वृद्ध महिला ताटकळत कार्यालयाच्या आवारामध्ये गर्दी करून बसलेले असतात. या वेळी नगरसेवक धीरज सूर्यवंशी, रवींद्र सदामते, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, किरण भोसले यांसह अन्य उपस्थित होते.