(म्हणे) ‘तालिबानी पुरस्कार देऊन शिर्डी संस्थानचा सत्कार करू !’
आंदोलनाची फजिती झाल्यानंतर तृप्ती देसाई यांची पुन्हा पोपटपंची !
मुंबई – ३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाही, तर आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू. त्या वेळी आम्ही शिर्डी संस्थानला ‘तालिबानी पुरस्कार’ देऊन सत्कार करू आणि त्यांच्या निर्णयाचा निषेध करू, अशी वल्गना तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.
या वेळी तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘‘आम्ही ‘शिर्डीला जाण्यावर ठाम आहोत’, अशी भूमिका मांडली होती; परंतु ‘जीविताला धोका असल्याने शिर्डीला जाता येणार नाही’, असे सांगून या आम्हाला आत सोडण्यात आले नाही. आम्हाला अटक केल्यानंतर शिर्डीमध्ये जल्लोष करण्यात आला. साईबाबा यांनी ‘सबका मालिक एक’, असे सांगितले आहे; मात्र तिथे महिलांना अटक झाल्यावर कुणी जल्लोष करत असेल, तर ही महिलांचा अपमान करणारी मानसिकता अजूनही शिर्डीत आहे. हीच मानसिकता पालटण्यासाठी आमचे आंदोलन आहे. या फलकाच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न संस्थानकडून केला गेलेला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे.’’ (वेब सिरीज, चित्रपट यांत अंगप्रदर्शन दाखवून महिलांची मानहानी केली जात असतांनाही त्याविषयी काही न बोलणार्या तृप्ती देसाई यांना भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा करून मंदिरात जाण्याचे आवाहन म्हणजे महिलांचा अपमान वाटतो. यातून तृप्ती देसाई यांच्या विचारांची विकृती दिसून येते ! – संपादक)