दैवी गुणांची खाण आणि चालते-बोलते अध्यात्म विश्वविद्यालय असलेल्या सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्विनी पवार !
कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी (११.१२.२०२०) या दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी मागील १० वर्षांपासून देवद आश्रमात वास्तव्याला आहे. मी आश्रमात राहिल्यामुळे मला साधना आणि सेवा करण्याची संधी लाभली आहे. आश्रमातील साधकांची साधना चांगली होत आहे. पू. (सौ.) अश्विनी पवार आश्रमातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. माझा त्यांच्याशी फारसा संपर्क नसतो, तरीही काही अनुभवांवरून मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये कृतज्ञतापुष्पांत गुंफून ती श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
भाग २.
भाग १. वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/429761.html
पू. (सौ.) अश्विनी पवार यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
६. मन आणि बुद्धी यांची प्रगल्भता
६ अ. ‘समष्टी संत म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असा वेळ आणि सेवा यांचा उपयोग कसा केला पाहिजे अन् त्यातून सेवेची फलनिष्पत्ती कशी वाढवायला हवी ?’, याविषयी पू. (सौ.) अश्विनीताईंनी अचूक मार्गदर्शन करणे : मी हिंदु जनजागृती समितीअंतर्गत सेवा करतो. त्याविषयी पू. ताईंना अनुभव नाही, तरीही मला आलेली अडचण मी त्यांना सांगितल्यावर ती त्यांच्या लक्षात येते आणि त्या साधनेच्या दृष्टीने उपाय त्यावरील सुचवतात. वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमानंतर मला संत घोषित केल्यावर मी पूर्वीचीच सेवा आणि वैयक्तिक अन् समष्टी मंत्रजप करत होतो. त्याचप्रमाणे सहसाधकांना लिखाण किंवा व्यष्टी साधना यांत साहाय्य करत होतो. यांविषयी मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी मला योग्य दृष्टीकोन दिला. ‘समष्टी संत म्हणून मी परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असा माझा वेळ आणि सेवा यांचा उपयोग कसा केला पाहिजे ? सेवेची फलनिष्पत्ती कशी वाढेल ?’, याविषयी त्यांनी मला अचूक मार्गदर्शन केले.
६ आ. आश्रमातील अनेक कार्यक्रमांच्या वेळी सर्व सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण रितीने पूर्ण करण्यास पू. ताई साधकांना सांगत असणे : देवद आश्रमात अधूनमधून सर्वांसाठी सत्संग, कार्यक्रम आणि उपक्रम चालू असतात. ‘एखाद्या साधकाचा वाढदिवस साजरा करणे, ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकाचा सत्कार करणे, संतपद घोषित होतांना संत सन्मान सोहळा आयोजित करणे, इथपासून ते एखाद्या साधकाचा मृत्यू झाला, तर अंत्यविधीचे नियोजन करणे, अग्निसंस्कार करणे, त्यानंतरही दहावा-बारावा-तेरावा आणि श्राद्ध हे सर्व विधी करणे’, यांचे नियोजन संबंधित साधकांकडून करण्यात येते. या सर्व सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण रितीने कशा करायच्या, याविषयी पू. ताई साधकांना मार्गदर्शन करतात.
६ इ. पू. ताईंनी विविध विधींच्या वेळी लागणारे साहित्य आणि विधी यांच्या बारकाव्यांची सूची साधकांना सिद्ध करण्यास सांगणे अन् त्यामुळे सर्व विधी एखाद्या सोहळ्याप्रमाणे पार पडणे : एकदा मी पू. ताईंना म्हणालो, ‘‘एखाद्याच्या घरी मृत्यू झाला, तर त्यांना आणि जवळच्या नातेवाइकांना ‘काय करायचे ?’, हे सुचत नाही. सर्व जण हतबल होतात. पुरोहित आणि साहित्य वेळेवर मिळत नाही. आश्रमात मात्र सर्वकाही सुरळीत होते आणि भावपूर्ण विधी केला जातो.’’ त्यावर पू. ताई म्हणाल्या, ‘‘यामध्ये चिंतन आणि मनन केलेले आहे. यात साहित्य आणि विधी यांचे पुष्कळ बारकावे असतात. साधकांनी याची सूची सिद्ध केली आहे. शिकून घेऊन कार्यपद्धत ठरवलेली आहे. त्यामुळे देवच सर्व करवून घेतो.’’
७. सेवेची तळमळ
७ अ. ‘आणखी सेवा करायला हवी आणि ‘स्व’चे विचार रहायला नकोत’, असे वाटणे : ‘सेवेविषयी तुमची तळमळ पुुष्कळ आहे’, असे मी पू. ताईंना म्हटल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी जी सेवा करते, ती कणभरपण नाही. ‘आणखी सेवा करायला हवी’, असे मला नेहमी वाटते. इतर साधकांना सेवा मिळण्यासाठी सेवेच्या मागे लागावे लागते; पण माझ्यामागे सेवा लागतात. देवाला मी म्हणते, ‘देवा, मला एवढी सेवा दे की, मान वर काढायला मला वेळ मिळायला नको. माझे ‘स्व’चे विचार रहायला नकोत, एवढे मला तुझ्या सेवेत गढवून ठेव.’
७ आ. ‘सेवा करतांना तुम्ही काय ध्येय ठेवता ?’, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘माझे ध्येय एकच असते की, माझ्याकडील सेवा पूर्ण झाल्या पाहिजेत.’’
७ इ. जेवता-जेवता साधकांशी साधनेविषयी प्रत्यक्ष आणि भ्रमणभाषवरून बोलणे : पू. ताई त्यांच्या सेवेच्या वेगाविषयी म्हणाल्या, ‘‘मला जेवता-जेवता साधकांशी प्रत्यक्ष आणि भ्रमणभाषवरून बोलायला देवाने शिकवले आहे. प्रसाधनगृहातही मी माझा भ्रमणभाष घेऊन जाते. तेथेही त्यातील संदेश वाचते आणि उत्तरे देते.’’
८. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी शिकवलेले चित्तात ठसल्याने त्याचा संस्कार झाल्याचे पू. ताईंनी सांगणे
पू. ताईंना मी सांगितले, ‘‘तुमची सेवा म्हणजे दैवी कार्य आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही किती बारीक विचार करून साधकांना कृती करण्यास सांगता !’’ त्यावर पू. ताई म्हणाल्या, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला तसा विचार करायला शिकवले आहे. ते चित्तावर ठसले आहे. माझ्यावर संस्कार झाला आहे की, सर्वकाही व्यवस्थितच झाले पाहिजे; म्हणून माझ्याकडून प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेतली जाते.’’
(क्रमशः)
– पू. (श्री.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.१०.२०२०)
भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/430999.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |