प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची अचानक शाळा पहाणी
कोल्हापूर – सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा चालू आहेत का ?, याची अचानक पहाणी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली. प्रथम त्यांनी महानगरपालिकेच्या राजमाता जिजामाता हायस्कूलला भेट देऊन प्रत्यक्ष वर्गात जाऊन अध्यापनाचे निरीक्षण केले. मुलांची बैठक व्यवस्था पाहिली. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना हात धुवायला लावून ते योग्य पद्धतीने हात धुतात का ते पाहिले आणि हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक स्वतः करून दाखवले. थर्मल स्कॅनर आणि सॅनिटायझरच्या वापराविषयी योग्य सूचना केल्या. त्यानंतर खासगी व्यवस्थापनाचे वसंतराव ज. देशमुख हायस्कूलला त्यांनी भेट देऊन तेथील नियोजनाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. स्कॅनरचा वापर, सॅनिटायझर आणि विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था पाहून त्याविषयी प्रशासक बलकवडे यांनी समाधान व्यक्त केले.