न्यायाची प्रतीक्षा !
गेल्या अनेक शतकांपासून हिंदूंची सहस्रो मंदिरे पाडून मशिदी उभारल्या गेल्या, हा इतिहास हिंदूंसाठी नवीन नाही. अर्थात् इतिहास नवीन नसला, तरी तो दुर्लक्षित करून चालणार नाही; कारण वैविध्यपूर्ण मंदिरांचा हिंदूंना मिळालेला वारसा या मशिदींमुळे गाडला गेला आहे. हे गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी हिंदूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. याच पार्श्वभूमीवर आधारित राजधानी देहलीतील कुतुब मिनार संकुलातील कुतुवत-उल्-इस्लाम या मशिदीवरही न्यायालयात दावा ठेवण्यात आला आहे. २७ नक्षत्रांचे प्रतीक असलेली २७ हिंदु आणि जैन मंदिरे फोडून ही मशीद बांधण्यात आली. या मंदिरांच्या खांबांवर देवतांची चित्रे आणि शिल्पे कोरण्यात आली होती. मशिदीमुळे मंदिरांतील पुष्कळ मूर्तींची हानी झाली आहे. आता तर मशिदीच्या आजूबाजूच्या क्षतीग्रस्त भागांतून देवतांच्या काही मूर्ती बाहेरही आल्या आहेत. मंदिरे पाडून मशीद उभारली गेल्याचे पुरावेही उपलब्ध असल्याचे न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेत म्हटले आहे. ही याचिका सरकारने नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठ पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी प्रविष्ट केली आहे. ही याचिका जैन तीर्थंकर वृषभ देव आणि भगवान विष्णु यांच्या नावावर प्रविष्ट करण्यात आली आहे. याचिकेच्या माध्यमातून ‘मशिदीसाठी तोडण्यात आलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून कायद्यानुसार २७ देवदेवतांची उपासना करण्याचा अधिकार हिंदूंना आहे’, असेही जैन यांनी सांगितले आहे. याचिका आणि त्यातील तथ्ये यांच्या अभ्यासासाठी न्यायालयाने सुनावणीची मुदत २४ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनीच हे प्रकरण हाती घेतले असल्याने कालांतराने याचा निकाल हिंदूंच्याच बाजूने लागेल, हे निश्चित; मात्र निकालापर्यंत न थांबता प्रत्येक हिंदूने पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या बाजूने ठामपणे उभे राहून त्यांना समर्थन देणेही तितकेच आवश्यक आहे. तसे करणे हे धर्मकर्तव्य बजावण्यासारखेच आहे.
हिंदुत्वाचे मूळ
इतिहासकारांनी म्हटले आहे की, महंमद घोरी याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याने देहली स्वतःच्या कह्यात घेतल्यावर वर्ष ११९२ ते ११९८ या अवघ्या ६ वर्षांत २७ मंदिरे पाडून ही मशीद उभारली. ती कुतुब मिनारच्या आवारात असल्याने तिला जागतिक वारशाचा दर्जा प्राप्त झाला आहे. अर्थात् एक धर्म गाडून त्यावर दुसरा धर्म प्रस्थापित करणे, हे संतापजनक आणि तितकेच अवमानकारक आहे. मशिदीच्या ‘कुवात-उल्-इस्लाम’ या नावाचा अर्थ ‘इस्लामची शक्ती’ असा होतो. हिंदु आणि जैन लोकांच्या धार्मिक भावना दुखावणे अन् त्यांच्यासमोर इस्लामची शक्ती दर्शवणे, हा या बांधकामामागील कुतुबुद्दीनचा धूर्त उद्देश होता. कुतुबुद्दीनच काय, तर अनेक इस्लामी आक्रमकांचे तेच षड्यंत्र होते; पण कितीही मंदिरे गाडली गेली, तरी त्यांचे सामर्थ्य कदापि न्यून होत नाही. अयोध्या येथील राममंदिराच्या खटल्याच्या निकालावरून याची प्रचीती आलेलीच आहे. त्यामुळे अयोध्येच्या निकालाची पुनरावृत्ती आता या मंदिरांच्या संदर्भातही व्हायला हवी. केवळ मंदिरांविषयीच चर्चा करून उपयोग नाही, तर तेथे असलेला कुतुब मिनार याचे मूळही हिंदु धर्मातच आहे. इतिहासाचे प्रख्यात गणितज्ञ वराहमिहीर यांनी सध्या असलेल्या कुतुब मिनार संकुलात ग्रहांच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी विशाल आधारस्तंभ बांधला होता. त्या खांबाला ‘ध्रुवस्तंभ’, ‘विष्णुस्तंभ’ किंवा ‘मेरूस्तंभ’ असे म्हटले जायचे; परंतु परकीय आक्रमणकर्त्यांनी त्याचे नाव ‘कुतुब मिनार’ ठेवले. अशा प्रकारे हिंदूंच्या पाऊलखुणा जाणीवपूर्वक पुसण्यात आल्या. हिंदूंचा सामर्थ्यशाली आणि वैभवशाली इतिहास ओरबाडण्यात आला, हे हिंदूंनी विसरायला नको. हिंदु धर्माचे सामर्थ्य जाणा ! आज पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्यासारखे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते अशा मंदिरांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कृतीशील आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गाडल्या गेलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार होईल आणि त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय पुन्हा एकवार संपूर्ण विश्वाला येईलच !
सरकारचे कर्तव्य
खरे तर मशिदीची संपूर्ण माहिती आणि त्याविषयीचे पुरावे असूनही तत्कालीन सरकारने हिंदु अन् जैन धर्मीय यांना खटला मांडण्याची संधी दिली नाही. मुसलमान समाजाने या जागेचा कधीच उपयोग केला नाही. ती भूमी वक्फचीही मालमत्ता नसल्याने सध्या सरकारच्या कह्यात आहे. आताच्या सरकारने हिंदु आणि जैन धर्मियांच्या भावनांचा विचार करायला हवा. सरकारने हिंदूंना त्यांचा धार्मिक वारसा मिळवून द्यायला हवा. मंदिरांचे जतन, संवर्धन किंवा जीर्णोद्धार करणे यांसाठी प्रत्येक वेळी हिंदूंनाच न्यायालयीन लढा द्यावा लागतो. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्यासारखे अनेक धर्मबलसंपन्न अधिवक्ते आज देशात आहेत. त्यांच्याकडे कायद्याचे शस्त्र असल्याने ते हिंदूंना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या सरकारला ते का जमत नाही ? खरे तर ते सरकारचेच कर्तव्य आहे; मात्र हिंदूबहुल भारतातील सरकार यासाठी पुढाकार का घेत नाही ? आपल्याच देशात प्रत्येक वेळी हिंदूंवरच लढण्याची वेळ आणणे, हे दुर्दैवी नव्हे का ? आणखी असे किती काळ चालू द्यायचे ? इस्लामीकरणामुळे नष्ट झालेला आणि हिंदु अस्मितेशी निगडित असणारा हिंदूंचा गौरवशाली इतिहास शोधण्याची वेळ आता आली आहे.
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी धर्मनिष्ठेच्या बळावर अयोध्येतील रामजन्मभूमीत श्रीरामाची पूजा करण्याच्या संदर्भातील खटला जिंकला होता. अयोध्येनंतर पू. (अधिवक्ता) जैन यांनी मथुरा, काशी आणि धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा येथे असणार्या इस्लामी आक्रमकांच्या खुणा पुसण्याचा निश्चय केला आहे. मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवर (जेथे श्रीकृष्णाचा जन्म झाला तेथे) सध्या मोगलांनी बांधलेली ईदगाह मशीद आहे. त्या संदर्भातील खटला ते लढवत आहेत. ‘ताजमहाल’चे खरे वास्तव उलगडण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मंदिरे गाडून मशिदी उभारल्याने भक्त आणि ईश्वर यांच्यावर झालेला अन्याय दूर होण्यासाठी आज धर्मनिष्ठ हिंदू अन् अधिवक्ते प्राणपणाने लढत आहेत. हिंदूंची मंदिरे पुन्हा त्यांना मिळावीत, यासाठी सरकारने आता कृतीशील व्हावे, हीच हिंदूंची अपेक्षा !