पैठण येथील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाचा होणार कायापालट

जागतिक स्तरावरील सल्लागार नियुक्त करा ! –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – संभाजीनगर जवळील पैठण येथील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तेथे आकर्षित करण्यासाठी नागरिकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना मागवा, तसेच जागतिक स्तरावरील सल्लागारही नियुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ८ डिसेंबर या दिवशी वर्षा येथील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पैठणला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. संभाजीनगर परिसरात आलेले पर्यटक पैठणला आवर्जून भेट देतात, तसेच या ठिकाणी जायकवाडीसारखे देशातील मोठे धरण आहे. त्यामुळे येथील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाची दुरवस्था दूर करून जागतिक दर्जाचे उद्यान या ठिकाणी बनायला हवे. या वेळी जलसंपदा प्रधान सचिव लोकेश चंद्र यांनी सांगितले की, २०० एकर भूमीवरील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी विभागाने ४० कोटी रुपयांचा प्रस्ताव केला आहे. या ठिकाणी ‘वॉटर पार्क’, खेळणी आणि प्राणीसंग्रहालय, ‘थीम पार्क’ उभारण्याचे नियोजन आहे.