(म्हणे) ‘कोणत्याही परिस्थितीत शिर्डीला जाणारच !’

चित्रपट, वेब सीरिज आदींतून पसरवल्या जाणार्‍या अश्‍लीलतेला विरोध न करता सभ्यतेला विरोध करणार्‍या तृप्ती देसाई यांची विकृती !

तृप्ती देसाई

पुणे – साईबाबा संस्थानने लावलेला फलक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून मला नोटीस दिली गेली. राज्यघटनेने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही शिर्डीला जाणारच, अशी भूमिका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी घेतली आहे. (सभ्य आणि सुसंस्कृत नागरिक मंदिरात कोणत्या पोषाखात जातात हे पाहिले, तर तोकड्या कपड्यात मंदिरात जाण्याचे समर्थन करणार्‍यांची मानसिकता काय असेल, हे लक्षात येते. सभ्यता कशाला म्हणावे आणि अश्‍लीलता हे समजण्याची पात्रता नसलेलेच अशा प्रकारची उठाठेव करू शकतात. – संपादक)

शिर्डी येथील साईबाबा संस्थानाच्या परिसरात मंदिरात सभ्य पोषाख परिधान करून प्रवेश करण्याचे आवाहन करणारा फलक लावण्यात आला आहे. या फलकाचे सर्व भाविकांकडून स्वागत करण्यात आले आहे; मात्र तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी हा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हणत हा फलक हटवण्याची मागणी केली आहे. १० डिसेंबर या दिवशी शिर्डी येथे जाऊन फलक काढण्याची चेतावणी त्यांनी दिली आहे. यावर शिर्डी येथील विभागीय दंडाधिकार्‍यांकडून ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत देसाई यांना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी पुणे येथे जाऊन ही नोटीस तृप्ती देसाई यांना दिली आहे; मात्र ही नोटीस एकतर्फी असल्याची आवई तृप्ती देसाई यांनी उठवली. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मात्र साईबाबा देवस्थानच्या या निर्णयाचे स्वागत केले असून तृप्ती देसाई यांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेला आक्रमकपणे उत्तर देण्याचा पवित्रा घेतला आहे.

फलक काढण्याची ‘स्टंटबाजी’ केल्यास शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देऊ ! – स्वाती परदेशी, महिला तालुका संघटक, शिवसेना

संस्कृतीच्या रक्षणासाठी ठोस भूमिका घेणार्‍या शिवसेनेच्या रणरागिणी महिलांचा आदर्श समस्त हिंदु महिलांनी घ्यावा !

पेहरावाविषयी साईबाबा संस्थानने सक्ती केलेली नसून विनंती केली आहे. महिलांवर अत्याचार होतात, तेव्हा तृप्ती देसाई कुठे असतात ? तृप्ती देसाई यांनी दर्शनासाठी यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू; मात्र फलक काढण्याची ‘स्टंटबाजी’ केल्यास शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देऊ. त्यांच्या तोंडाला काळे फासू.