सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनात सहभागी व्हा ! – मंगेश जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – देशाच्या रक्षणार्थ अनेक सैनिकांनी त्यांचे प्राण पणाला लावून देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. काहींनी स्वत:च्या प्राणांची आहुतीही दिली आहे. सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ध्वजनिधी संकलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी केले.
सशस्त्र सेना ध्वजदिन ७ डिसेंबरला साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जुन्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, साहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
‘सैन्य दलात अधिकाधिक युवा वर्गाने जावे, यासाठी त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सैन्य दलातील वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शन शिबिरांचे शाळा, महाविद्यालये यांमध्ये आयोजन करण्यावर भर देणे आवश्यक आहे. सैन्यातील सेवा म्हणजे देशातील सर्वांत अभिमान वाटणारी सेवा आहे’, असे जिल्हाधिकारी जोशी यांनी या वेळी सांगितले.
या वेळी ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट काम करणार्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.