कुजिरा, बांबोळी संकुलातील शिक्षिका कोरोनाबाधित : विद्यालयाचे नियमित वर्ग रहित
पणजी, ९ डिसेंबर (वार्ता.) – कुजिरा, बांबोळी संकुलातील ‘मुष्टीफंड विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय’मधील एक शिक्षिका कोरोनाबाधित झाली आहे. यामुळे विद्यालयाचे इयत्ता १० आणि १२ वीचे नियमित वर्ग १२ डिसेंबरपर्यंत रहित करण्यात आले आहेत. राज्यात इयत्ता १० आणि १२ वीच्या नियमित वर्गांना प्रारंभ झाल्यानंतर शिक्षक कोरोनाबाधित होण्याची ही राज्यातील दुसरी घटना आहे. ८ डिसेंबर या दिवशी उसगाव, फोंडा येथील एका विद्यालयाची शिक्षिका कोरोनाबाधित झाली होती.
शिक्षिका कोरोनाबाधित झाल्यानंतर ‘मुष्टीफंड विद्यालय आणि उच्चमाध्यमिक विद्यालया’च्या व्यवस्थापनाने सांगितले की, विद्यालय संकुलाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत संकुल बंद ठेवण्यात येणार आहे आणि नियमित वर्गांना पुन्हा सोमवार, १४ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे; मात्र शिक्षकांना या काळात पूर्वीप्रमाणे ‘ऑनलाईन’ वर्ग घेणे चालू करण्यास सांगण्यात आले आहे.
‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’च्या गोवा विभागाने शिक्षण संचालकांची भेट घेऊन शिक्षक कोरोनाबाधित झाल्याच्या घटना घडत असल्याने शाळांचे नियमित वर्ग (ऑफलाईन) रहित करण्याची मागणी केली आहे.
इयत्ता ९ वी आणि ११ वीचे नियमित वर्ग घेण्यास अनुमती दिलेली नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी – शासनाने इयत्ता ९ वी आणि ११ वीचे नियमित वर्ग (ऑफलाईन वर्ग) घेण्यास अनुमती दिलेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
विद्यालयांचे शिक्षक कोरोनाबाधित असल्याच्या २ घटना राज्यात घडल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘एखाद्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित झालेली असल्यास त्या कुटुंबातील शिक्षक अथवा शिक्षिका यांना नियमित वर्ग घेण्याची शाळेच्या व्यवस्थापनाने अनुमती देऊ नये. प्रत्येक शाळांना मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत आणि त्याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे.’’