‘आयुष’ मंत्रालयांतर्गत येणार्‍या औषधांना प्रोत्साहन दिल्याने अ‍ॅलोपॅथीवर  परिणाम होत असल्याचा गोव्यातील डॉक्टरांचा दावा !

मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

पणजी, ९ डिसेंबर (वार्ता.) – केंद्रशासनाने ‘आयुष’ मंत्रालयांतर्गत येणार्‍या औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांना गोव्यातील डॉक्टरांनी विरोध दर्शवला आहे. केंद्राच्या या प्रयत्नांचा निषेध करणारे एक निवेदन ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या गोवा विभागाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले आहे. हे निवेदन देतांना ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या गोवा विभागाचे अध्यक्ष डॉ. सॅम्युएल एस्. आणि डॉ. शेखर साळकर यांची उपस्थिती होती.

याविषयी डॉ. सॅम्युएल एस्. म्हणाले, ‘‘देश स्वतंत्र झाल्यापासून देशात ‘अ‍ॅलोपॅथिक’ उपचारपद्धत यशस्वीपणे राबवली जात आहे. ‘आयुष’ मंत्रालयांतर्गत येणार्‍या औषधांना प्रोत्साहन दिल्याने ‘अ‍ॅलोपॅथिक’ उपचारपद्धत राबवण्यावर परिणाम होत आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ला ‘आयुष’ मंत्रालयांतर्गत येणार्‍या उपचारपद्धतींविषयी खूप आदर आहे आणि या उपचारपद्धतींना प्रोत्साहन देणेही योग्य आहे; मात्र केंद्र सरकार सद्यःस्थितीत उपलब्ध असलेली उपचारपद्धत सुदृढ करण्याऐवजी ती कमकुवत करत आहे. हे खेदजनक आहे.’’ (आतापर्यंत अ‍ॅलोपॅथिक भारतात आल्यापासून सरकारने आयुर्वेदाला मान्यता दिली नव्हती. खरेतर आयुर्वेदीय औषधे ही भारतात पूर्वापार चालत आली असून त्याचे चांगले परिणामही जाणवले आहेत. त्याचे दुष्परिणामही (साईड इफेक्टही) अल्प आहेत ! – संपादक)