‘पी.एफ्.आय.’वर बंदीसाठी गोव्यात ‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे १६ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन
पणजी, ९ डिसेंबर (वार्ता.) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या आतंकवादी संघटनेवर बंदी घालण्याचा केंद्रशासन विचार करत आहे. या संघटनेवर झारखंड येथे बंदी आहे आणि उत्तरप्रदेश सरकार या संघटनेवर बंदी घालण्याच्या विचारात आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या या विषयावर गोव्यातील भाजप शासन गंभीर नसल्याचे दिसत आहे. या सूत्राकडे एकगठ्ठा मतांच्या राजकारणाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर गोव्यात बंदी घालावी, या मागणीवरून ‘श्री परशुराम गोमंतक सेना’ समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सहकार्याने १६ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे, अशी माहिती ‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे श्री. शैलेंद्र वेलींगकर यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
श्री. शैलेंद्र वेलींगकर पुढे म्हणाले, ‘‘गतवर्षी पणजी येथील आझाद मैदानात ‘सीएए’च्या विरोधात झालेल्या मोर्च्यात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा सहभाग होता. या संघटनेचे तुर्कस्तान येथील आतंदवादी संघटनेशी संबंध असल्याचे वृत्तही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर झळकले आहे. या संघटनेवर गोव्यात बंद घालण्याची मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे ३ मासांपूर्वी केली होती; मात्र या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात आताच कारवाई न झाल्यास गोव्याचा पश्चिम बंगाल किंवा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. या संघटनेने ‘बाबरी’ विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करून गोव्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. धार्मिक सलोखा अबाधित असलेल्या गोव्यात धार्मिक दंगली घडवण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे.’’