मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवली न जाणे ही ठाकरे सरकारची नाचक्की ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
कोल्हापूर – सरकारची पूर्वसिद्धता नसल्याने मराठा आरक्षणाची स्थगिती कायम राहिली. ही ठाकरे सरकारची नाचक्कीच आहे. आज न्यायालयात पुन: पुन्हा तीच तीच सूत्रे मांडली गेली. न्यायालयापुढे सरकारी अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी कोणतीही नवीन सूत्रे मांडले नाहीत. जेव्हा पुनर्विचार याचिका दाखल केली जाते, तेव्हा नवे मुद्दे मांडायचे असतात. मागच्या वेळी जे मुद्दे मांडले तेच आज पुन्हा मांडले गेले म्हणूनच यावरची स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आता जानेवारीत सुनावणी होणार असल्याने मराठा समाजापुढे मोठा अंधार निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते ९ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढील सुनावणी होईपर्यंत सरकारने इतर माध्यमातून मुलांना साहाय्य करावे ! – छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार
कोल्हापूर – माझी सरकारला विनंती आहे. मुलांची हानी होत आहे, मुलांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे. त्यांना पुढे काय करायचे ते कळत नाही. सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. तोपर्यंत इतर माध्यमातून मराठा समाजातील मुलांना कसे साहाय्य करता येईल, हे पाहून सरकारने युद्धपातळीवर निर्णय घ्यावा, अशी मी विनंती करतो, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे.