६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्वाती शिंदे यांना बालसंत पू. वामन राजंदेकर यांच्या संदर्भात आलेली अनुभूती !
१. पू. वामन यांनी मनातील इच्छा जाणून सूक्ष्मातून घरी येऊन वास्तूशुद्धी केल्याचे जाणवणे
‘पू. वामन यांची आणि माझी आधीच्या जन्मांपासून ओळख आहे’, असे मला वाटते. ‘पू. वामन आमच्या घरी आल्यास त्यांच्या चरणस्पर्शाने वास्तूची शुद्धी होईल’, असे मला वाटायचे; पण ‘ते शक्य नाही’, हेही मला ठाऊक होते. एकदा पू. वामन ‘मला मनातून काहीतरी सांगत आहेत’, असे वाटले. मला सूक्ष्मातून दिसले, ‘आम्ही घरी सर्व सिद्धता केली आहे. सजावट केली आहे. रांगोळी काढली आहे. तोरणे लावली आहेत. सर्व जण संतांच्या आगमनाची वाट पहात आहेत. पू. वामन घरी आले. आम्ही दारातच पू. वामन यांची पाद्यपूजा केली. नंतर पू. वामन आई-वडिलांचा हात पकडून आनंदाने घरी आले.’ मी जणू उघड्या डोळ्यांनी ते अनुभवत होते.
२. ‘एखाद्याच्या मनातील भाव अन् तळमळ जाणून ते इच्छा पूर्ण करत असणे’, असे पू. वामन यांनी सूक्ष्मातून सांगणे
तेव्हा पू. वामन मला (मनातूनच) सांगत होते, ‘अगं, संतांना स्थुलाचे बंधन नसते. एखाद्याच्या मनातील भाव, तळमळ जाणून ते ती कसेही करून पूर्ण करतात.’’ त्यामुळे ‘स्थुलातून मी तिकडे येण्याची आवश्यकता नाही. मी सूक्ष्मातून तुझी इच्छा पूर्ण केली आहे.’
– सौ. स्वाती शिंदे (पूर्वाश्रमीच्या कु. स्वाती गायकवाड) (२५.८.२०२०)
पू. वामन जणू रूप साजिरे श्रीहरिचे भासते ।
दुडुदुडु धावत येती पू. वामन ।
चाहुलीने त्यांच्या आनंदी होते मन ॥ १ ॥
छुमछुम वाजती पैंजण तयांचे ।
कारंजे उडती हृदयी आनंदाचे ॥ २ ॥
हास्य मुखावरी मोहक विलसते ।
रूप साजिरे श्रीहरिचे जणू भासते ॥ ३ ॥
शब्द न कळती परि असे अतिमधुर वाणी ।
तयांच्या अस्तित्व मात्रे हृदयी आमुच्या ॥
स्फुरती मंजुळ गाणी ॥ ४ ॥
– सौ. स्वाती शिंदे (पूर्वाश्रमीच्या कु. स्वाती गायकवाड), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.८.२०२०)
• सूक्ष्म: व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |