मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह ‘ट्वीट’ केल्याप्रकरणी लोकशाही असलेल्या अन्य देशांत काय कारवाई होते ? याची माहिती द्या !
मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यशासनाला निर्देश
मुंबई – लोकशाही असलेल्या अन्य देशांत तेथील नागरिकांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट किंवा ‘ट्वीट’ केले, तर तेथे काय कारवाई करण्यात येते ? याची माहिती द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ‘ट्वीट’ केल्याविषयी नवी मुंबई येथील सुनैना होले यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा रहित करावा, यासाठी सुनैना यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपिठापुढे ११ डिसेंबर या दिवशी सुनावणी झाली. या वेळी आरोपीच्या अधिवक्त्यांनी सुनैना यांनी कोणताही समाज, जाती आणि धर्म यांविषयी द्वेष करणारी पोस्ट केलेली नाही, असे न्यायालयात केलेल्या युक्तीवादात म्हटले आहे.