लैंगिक अत्याचारप्रकरणी २ आरोपींना न्यायालयाकडून २० वर्षांची शिक्षा
४ वर्षांची मुलगी लैंगिक अत्याचाराविषयी खोटे बोलू शकत नसल्याचे न्यायालयाकडून नमूद
मुंबई – ४ वर्षांची मुलगी लैंगिक अत्याचाराविषयी खोटे बोलू शकत नाही, असे नमूद करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयाने २ आरोपींना दोषी ठरवून त्यांना प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा सुनावली.
आरोपींनी पीडितेच्या निरागसतेचा आणि तिच्या विश्वासाचा अपलाभ घेतला. त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दया दाखवणे योग्य ठरणार नाही, असे निकाल देतांना न्यायाधीश संजश्री घरत यांनी नमूद केले. वर्ष २०१८ मध्ये परळ येथे घडलेल्या या घटनेविषयी आर्.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात पोक्सो च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. पीडितेला काडेपेटीचा धाक दाखवून आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली होती; मात्र त्यातील एकजण अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या विरोधात स्वतंत्र खटला चालवला जाणार आहे. या प्रकरणात पोलिसांना कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला नाही. पीडित मुलगी लहान असल्याने अन्वेषणाच्या वेळी ती नीट सांगू शकली नाही. पोलिसांनी शेजार्यांकडे केलेल्या चौकशीतही काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे आरोपींच्या अधिवक्त्यांनी सांगितले.