८ कोटी रुपयांच्या उद्यान घोटाळ्यातील ३ अधिकारी निलंबित
नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ८ कोटी रुपयांच्या उद्यान घोटाळ्यातील ३ अधिकार्यांना निलंबित करून कंत्राटदारांचे कंत्राट रहित केले आहे. उद्यान अधिकारी चंद्रकांत तायडे, साहाय्यक उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी आणि उद्यान अधीक्षक प्रकाश गिरी अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्यांची नावे आहेत.
हिरावती इंटरप्रायजेस आणि एन्.के. शहा इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंत्राटदारांना शहरातील चौक अन् उद्यान संवर्धनाचे काम देण्यात आले होते. कंत्राटदाराला १५ मे या दिवशी कार्यादेश दिला असतांनाही १ मेपासून काम केल्याचे देयक दिल्याचे दाखवण्यात आले आहे. कंत्राटदाराने ‘मे ते ऑगस्ट मासामध्ये उद्यान संवर्धनाचे काम केले’, असे दाखवून ८ कोटी रुपयांची देयके पालिकेकडून संमत करून घेतली होती. या प्रकरणी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी याविषयी चौकशी समिती नेमली होती. चौकशीत तथ्य आढळून आल्याने संबंधित अधिकार्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करून १५ दिवसांत ८ कोटी रुपये भरण्याचे आदेश अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.