मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथे ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद, तर कोकणात प्रतिसाद नाही

  • भाजप आणि मनसे वगळता अन्य पक्षांचा बंदमध्ये सहभाग

  • सार्वजनिक वाहतूक सुरक्षित; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

मुंबई – केंद्रसरकारने कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी घोषित केलेल्या ‘बंद’ला मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते ‘बंद’मध्ये सहभागी झाले होते. भाजप आणि मनसे वगळता शेकाप, तसेच अन्य स्थानिक संघटनाही बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मात्र बंदला प्रतिसाद लाभलेला नाही.

बंदच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या पुढाकाराने मोर्चे काढण्यात आले. या सर्व ठिकाणी सार्वजनिक वाहतूक मात्र व्यवस्थित चालू होती. रिक्शा, टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोणत्याही ठिकाणी हिंसक प्रकार घडला नाही; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणे, तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता.