सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला ‘आदर्श पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित
मराठी पत्रकार परिषदेकडून कार्याची नोंद
सिंधुदुर्ग – आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचे स्मारक व्हावे, यासाठी सतत २५ वर्षे पाठपुरावा करून स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार्या सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाला यावर्षीचा मानाचा समजला जाणारा ‘रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्यात सर्वोत्कृष्ट काम करणार्या जिल्हा पत्रकार संघाला प्रतिवर्षी हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. मानपत्र, स्मृतीचीन्ह, शाल आणि श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये पालघर जिल्ह्यात होणार्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस्.एम्. देशमुख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्रात मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या जिल्हा पत्रकार संघांच्या वतीने पत्रकारांच्या अधिकारांचे, तसेच सामाजिक दायित्वाचे भान ठेवत अनेक उपक्रम राबवले जातात. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांचा यथोचित सन्मान परिषदेच्या वतीने करण्यात येतो. यापूर्वी नाशिक, भंडारा, नांदेड, पुणे आदी जिल्ह्यांना परिषदेच्या वतीने गौरवण्यात आले आहे.
समाज आणि पत्रकार यांना उपयुक्त विविध उपक्रम राबवण्यासह नियमित निवडणुका, चोख आर्थिक व्यवहार, नियमित बैठका घेऊन संघटनशक्ती वाढवण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने केले आहे. एक आदर्श जिल्हा पत्रकार संघ म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा संघाचे काम चालू असल्याने परिषदेने सिंधुदुर्गची निवड केल्याचे देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे.
या पुरस्काराविषयी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्गचे सुपुत्र गजानन नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांचे अन् त्यांच्या सर्व सहकार्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.