चि. संदीप शिंदे यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
समष्टी प्रकृतीचे आणि सेवेशी संबंधित अनेक कौशल्ये आत्मसात करणारे श्री. संदीप शिंदे !
‘गुरुकृपेने श्री. संदीप शिंदे याच्यासह अनेक वर्षे सेवा करण्याची संधी मला मिळाली. मी ‘सनातन प्रभात’च्या संपादकीय विभागात सेवा करत असतांना श्री. संदीप शिंदे याच्याशी प्रथम संपर्क आला. त्या वेळी खरे तर दैनिकात झालेली एक चूक सांगण्यासाठी मी त्याला प्रथमच संपर्क करत होतो; पण ती चूक दूरभाषवरच नम्रपणे स्वीकारणारा युवावस्थेतील श्री. संदीप मला आजही आठवतो. त्यानंतर पुढे त्याच्यातील कला-गुणांमुळे तो कलेच्या संबंधी सेवेसाठी आला. या काळात श्री. संदीप माझा सर्वांत चांगला मित्र आहे. त्याने नेहमीच मला व्यष्टी साधनेत आणि समष्टी सेवेत साहाय्य केले. त्याच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे. त्याच्या जीवनातील मंगलमय क्षणाच्या दिवशी त्याच्याप्रती शब्दांतून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न करत आहे.
१. जवळीक साधणारी समष्टी प्रकृती
श्री. संदीपचा स्वभाव मोकळेपणाने बोलण्याचा आहे. त्याचे मुखमंडल हसतमुख आहे. त्याच्या या गुणांमुळे सहसाधकांशी बोलतांना त्याची लगेच जवळीक होते. या गुणांमुळे सर्वांना श्री. संदीपचा आधार वाटतो.
२. सेवेशी संबधित अनेक गुण विकसित करणे
प्रसारसाहित्याची सेवा करतांना त्याने परिपूर्ण रचना, रंग-संगती, सात्त्विक सादरीकरण ही सर्व कौशल्ये अल्प वेळेत शिकून घेतली. केवळ संगणकीय कौशल्यच नाही, तर प्रसारसाहित्यासाठी लागणारे कौशल्य शिकून घेतले. कुठलीही सेवा मन लावून करणे, हा स्वभाव असल्याने त्याने सेवा शिकून घेतल्या.
३. चुका स्पष्टपणे सांगणारा तत्त्वनिष्ठ मित्र
श्री. संदीप यांनी माझ्या समवेत सेवा करतांना माझ्या चुका वेळोवेळी सांगून मला खर्या अर्थाने समष्टी साधनेसाठी साहाय्य केले आहे. मलाच नाही, तर अनेकांचाही तो चुका स्पष्टपणे सांगणारा तत्त्वनिष्ठ मित्र आहे. त्यामुळे मला आणि माझ्यासारख्या अनेकांना साधनेसाठी त्याचा लाभ झाला आहे. यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे.
‘श्री. संदीप यांच्याकडून गुरूंना अपेक्षित समष्टी साधना व्हावी आणि त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती व्हावी’, ही त्याच्या विवाहानिमित्त श्रीगुरुचरणी प्रार्थना !
– श्री. चेतन राजहंस, सनातन आश्रम,रामनाथी, गोवा. (५.१२.२०२०)
कु. पूनम साळुंखे यांना चि. संदीप शिंदे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
‘संदीपदादाची आणि माझी ओळख मी मिरज आश्रमात असतांना झाली. त्यानंतर रामनाथी आश्रमात आल्यानंतर त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे आमच्यात अगदी सख्ख्या भावा-बहिणीप्रमाणे जवळीक झाली. ‘साधनेतील नाती ही व्यवहारातील नात्यांहूनही अधिक जवळची असतात’, हे संदीपदादाच्या उदाहरणातून लक्षात येते. संदीपदादाचे आश्रम हेच घर आहे आणि साधक हेच कुटुंबीय आहेत !
१. जवळीक साधणे
संदीपदादाच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याची सर्वांशी लगेच जवळीक होते. त्याने आजपर्यंत जिथे जिथे सेवा केली आहे, तेथील सर्वांशी त्याची अजूनही जवळीक आहे.
२. स्वीकारण्याची वृत्ती
मी त्याच्यापेक्षा वयाने लहान आहे, तरीही मी त्याला त्याच्या पुष्कळ चुका सांगते आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करायला सांगते, तरीही तो कधीही ‘नाही’ म्हणत नाही किंवा त्याला माझ्याविषयी कधी प्रतिक्रियाही आल्या नाहीत. त्याला सांगितलेल्या चुकांविषयी तो लगेच क्षमा मागतो.
३. जाणवलेला पालट – स्थिरता वाढल्याचे जाणवणे
तो मनाने बराच हळवा आहे. पूर्वी त्याला काही गोष्टींचे किंवा जवळच्या व्यक्तींच्या वेगळ्या वागण्याचे लगेच वाईट वाटायचे; पण आता त्याने त्यावर चांगल्या प्रकारे मात केली आहे. पूर्वीपेक्षा त्याच्यात बर्याच प्रमाणात स्थिरता वाढली आहे.
आमच्यात भावा-बहिणीचे नाते असले, तरीही आमच्यात आध्यात्मिक मैत्रीही आहे. ‘देवाने मला असा प्रेमळ आणि बहुगुणी व्यक्तीमत्त्व असलेला भाऊ दिला’, यासाठी मी त्याच्या चरणी कृतज्ञ आहे.’ (५.१२.२०२०)
– कु. पूनम साळुंखे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |