वाळू तस्करीवर नियंत्रण कधी ?
अवैध व्यवसायात सर्वांत अधिक जोर धरलेली वाळूची तस्करी रोखण्यात प्रशासनाला अद्यापपर्यंत अपेक्षित असे यश आलेले नाही. वाळूची तस्करी करणारे मुजोर झाले असून राजरोसपणे वाळूचा उपसा केला जात आहे. अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी जाणार्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून होणारी आक्रमणे वाढली आहेत. सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून दिवसरात्र वाळू उपसा चालू आहे. याविषयीची माहिती गावातील महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलीस यांना असूनही त्याकडे दुर्लक्ष का केले जाते ? पोलीस यंत्रणा काय करत असते ? गावातून वाहने बाहेर कशी सोडली जातात ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. महसूल पथकाकडून कारवाई झालीच, तर वाहने जप्त करणे, जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करून वाळूचा उपसा करणारी बोट उडवणे, यंत्रसामग्री जप्त करणे, अशी वरवरची कारवाई होते. अशा प्रकारे वरवरच्या कारवाईमुळे वाळू उपशाला कधीच आळा बसत नाही.
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर वाळू तस्करांकडून सशस्त्र आक्रमण केले जाते. त्यांच्याकडे शस्त्रे कुठून येतात ? महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती या मंडळींना कशी मिळते ? तसेच कायदा-सुव्यवस्था मोडीत काढण्याचे धाडस या लोकांकडे कुठून येते ? असेही प्रश्न उपस्थित होतात. वाळू उपसा बंदीचा कायदा असूनही त्याची कठोर कार्यवाही होत नाही. अवैध वाळू उपसा करणार्यांना एकाला तरी कठोरातील कठोर शिक्षा झाली, असे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही. मग उपसा करणार्यांवर धाक कसा रहाणार ? हा धाक न राहिल्यानेच अधिकारी आणि पोलीस यांच्या अंगावर वाहन घालून जीव घेण्याचे अघोरी प्रकार होत आहेत. वाळू उपशामुळे भीमा नदीच्या पात्रातील मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. नदी पात्रात मोठमोठे खड्डे निर्माण होऊन ते नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. जो तो आपली पोळी भाजली जात आहे ना, एवढेच पहात आहे. यामध्ये पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांचे लागेबांधे असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या यंत्रणेला आळा बसण्यासाठी कठोर कायदा करून त्याची प्रभावी कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
– श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर