साधकांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणार्या आणि आनंदी असणार्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड !
१. कु. पूनम साळुंखे, सनातन आश्रम, गोवा.
‘स्वातीविषयी लिहायचे, म्हणजे केवळ भक्ती आणि भाव यांविषयीच लिहावे लागेल; कारण तिची प्रत्येक कृती भक्तीने भारलेली, भावमय आणि अनुसंधानात राहून केलेली असते. आज तिच्या विवाहानिमित्त तिच्याविषयी लिहितांना केवळ भक्तीभावाची सूत्रेच माझ्या लक्षात आली; कारण स्वाती म्हणजे भक्ती आणि भाव ! मला जाणवलेली स्वातीतील ही भक्तीभावाची सूत्रे मी गुरुचरणी अर्पण करत आहे.
१ अ. छोट्या छोट्या गोष्टींतही भाव अनुभवणे : ‘स्वातीचा स्वभाव अबोल आणि लाजरा असल्यामुळे ती विशेष बोलायची नाही, तरी ‘ती छोट्या छोट्या गोष्टींतही भाव अनुभवते’, असे माझ्या लक्षात यायचे. ‘ती एका संतांचे जेवण घेऊन यायची, तेव्हा ती श्रीकृष्णाच्या बासरीतून चालत आहे’, असा भाव ठेवायची.
१ ई. समष्टीतील सेवा करतांना स्वतःचा मूळ अबोल स्वभाव पालटून साधकांशी बोलण्यातील आनंद घेणे : स्वातीला समष्टी सेवा करायला सांगितली. तेव्हा तिला ते फार कठीण जायचे; कारण तोपर्यंत ‘ती, देव आणि तिचा देवाविषयी असलेला भाव’, एवढेच तिचे विश्व होते. ती अबोल असल्यामुळे ती तिच्या भावमय विश्वातच रममाण झालेली असायची; पण समष्टी सेवेत सतत साधकांशी संपर्क, सत्संग, त्यांच्या अडचणी सोडवणे, असे करावे लागते आणि त्यासाठी त्यांच्याशी सतत बोलावे लागते. हे सर्व तिला फारच कठीण जायचे. तिला वाटायचे, ‘आता माझ्यात भावच राहिला नाही का ?’ आणि तिला त्याचे फार वाईट वाटायचे. तेव्हा तिला समजवावे लागायचे, ‘‘स्वाती, समष्टीत साधक हाच देव असतो आणि तू व्यष्टी साधनेत देवाशी बोलतेस, तसे ‘समष्टीत साधकांशी बोलणे’, हे देवाशीच बोलणे आहे.’’ हळूहळू तिने तिच्या विचारांवर आणि अबोल स्वभावावर चांगल्या प्रकारे मात केली. आता ती साधकांचे व्यष्टी साधनेचे आढावे आणि सत्संग घेते अन् आता त्यातून ती साधकांशी बोलण्यातला आनंदही घेते.
१ उ. समष्टी सेवा करतांनाही भावावस्थेत रहाणारी स्वाती ! : ती प्रत्येक सेवा करतांना तिला भाव जोडते. एकदा साधक श्री. प्रकाश सुतार यांची लहान मुलगी चि. आनंदी हिचे एका संतांसमवेत छायाचित्र काढायचे होते. आम्ही त्याची सिद्धता करत होतो. तेव्हा स्वाती मला म्हणाली, ‘‘ताई, मला प्रश्न पडला आहे, ‘आनंदीला अजून बोलताही येत नाही किंवा या वयात अजून ‘तिला काय आणि किती कळले ?’, हेही ठाऊक नाही, तर ती देवाशी काय बोलेल ? देव तिच्याशी काय बोलेल ? ते मनातून एकमेकांशी बोलतील का ?’’ तिचे हे बोलणे ऐकून मला पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण माझ्या मनात असा विचार कधीच आला नव्हता. या सेवेची सिद्धता करतांनाही स्वाती भावाच्याच स्थितीत होती. नंतर स्वाती मला म्हणाली, ‘‘त्यांच्यात सूक्ष्मातून काय घडेल ?’, हे आपल्याला कळले असते, तर किती बरे झाले असते ना ?’’ तिच्यामुळे त्या वेळी मलाही भावस्थिती अनुभवता आली.
१ ऊ. भाव आणि निखळ प्रेम यांच्या स्पंदनांमुळे स्वातीची प्रत्येक कृती सहजतेने ओळखता येणे : स्वाती मला माझ्या प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी खाऊ देते. त्या खाऊवर तिने छानसे चित्र काढलेले असते किंवा त्यावर काहीतरी कृतज्ञतापर काव्य किंवा गद्यातून काही ओळी लिहिलेल्या असतात; पण त्यावर तिने तिचे नाव लिहिलेले नसते; पण ते चित्र किंवा ते लिखाण इतके भावमय असते की, आतापर्यंत प्रत्येक वेळी त्या भावाच्या स्पंदनांवरून मला ‘हे स्वातीनेच दिले आहे’, हे लगेच ओळखता आले. काही वेळा कधी तिने मागून येऊन माझे डोळे झाकल्यावरही आतापर्यंत ‘ती स्वाती आहे’, हे मला लगेच ओळखता आले. ती मला विचारायची, ‘‘ताई, तू प्रत्येक वेळी मला कसे काय ओळखतेस ?’’ तेव्हा मी तिला म्हणते, ‘‘स्वाती, तुझ्यातील प्रेम आणि भाव यांची स्पंदनेच इतकी आहेत की, ती स्पंदनेच मला ‘ही स्वाती आहे’, असे सांगतात.’’
अशी भावमय आणि प्रेमळ लहान बहीण दिल्याविषयी देवाच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
२. कु. योगिता पालन, सनातन आश्रम, गोवा.
२ अ. जीवलग मैत्रीण : ‘स्वातीताई ही माझी प्रिय मैत्रीण आहे. भाववृद्धी सत्संगाच्या सेवेमुळे आमची जवळीक झाली.
२ आ. तत्त्वनिष्ठ : खरेतर आध्यात्मिकदृष्ट्या ती माझ्यापेक्षा मोठी आहे; परंतु तिच्या वागण्या-बोलण्यातून तसे कधीच जाणवत नाही. तिने मलाही कधीच मानसिक स्तरावर हाताळले नाही. काही प्रसंगांत मी तिच्याशी बोलल्यावर तिच्या लक्षात आलेल्या माझ्या चुका आणि माझा अहंचा भाग ती मला तत्त्वनिष्ठपणे सांगते.
२ इ. सहजता आणि इतरांना प्रेमाने समजून घेणे : आतापर्यंत तिने अनेक साधकांचे स्वभावदोष-निर्मूलन सत्संग आणि व्यष्टी साधनेचे आढावे घेतले आहेत, तसेच त्यांच्या चुकाही सांगितल्या आहेत, तरीही अन्य वेळी ती त्यांच्याशी प्रेमाने आणि नम्रपणे वागत असल्याने साधकही तिच्याशी सहजतेने वागतात. त्यांना तिचा आधार वाटतो आणि तिच्याविषयी प्रेमही वाटते. स्वातीताई फार प्रेमळ आहे. ती सतत दुसर्यांना समजून घेऊन वागते. ती तिच्या सेवेत व्यस्त असल्यामुळे आमची नेहमी भेट होत नाही, तरीही आमची मैत्री तशीच आहे.
२ ई. इतरांचा विचार करणे : तिला ‘आपल्यामुळे दुसर्यांना त्रास होऊ नये’, असे नेहमी वाटते. तिच्या व्यस्ततेतूनही ती खोलीची स्वच्छता नियमित करणे, दुसर्यांची जमेल, तेवढी काळजी घेणे, असे करते. त्यामुळे तिचा सहवास सर्वांनाच हवाहवासा वाटतो. साधकांनाही तिच्याशी बोलतांना आनंद मिळतो.
२ उ. परात्पर गुरुदेवांप्रती असलेला भाव
१. प्रत्येक गोष्ट ती परात्पर गुरुदेवांशी जोडते. ती साधकांच्या चुकांमधून किंवा घडत असलेल्या प्रसंगांमधून शिकते. त्या प्रसंगांतही ती परात्पर गुरुदेवांंना जोडून त्यातील आनंद घेऊन भावस्थितीत रहाते. ती छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद घेते.
२. मनाच्या संघर्षावर मात करण्यासाठी ती गुरुदेवांना शरण जाऊन आत्मनिवेदन करते.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या केवळ स्मरणानेही तिला त्यांच्यावर उत्स्फूर्तपणे भावमय कविता सुचतात. वेगवेगळ्या प्रसंगीही तिला उत्स्फूर्त कविता सुचतात. ती म्हणते, ‘‘भगवंत मला जे शब्दमोती देतो, ते मी भावाने झेलण्याचा प्रयत्न करते.’’
४. अनेकदा ती गुरुदेवांच्या आठवणीने रडते. ‘गुरुदेव आपल्यासाठी किती करतात ?’, याविषयी तिला पुष्कळ कृतज्ञता वाटते.
५. ती एकदा परात्पर गुरुदेवांविषयी बोलायला लागली की, तो एक भाववृद्धी सत्संगच होऊन जातो. तेव्हा ती स्वतःच्या समवेत अन्य साधकांनाही भावस्थितीत घेऊन जाते. ती ते सांगत असतांना आपल्याला ते भावक्षण प्रत्यक्ष अनुभवत असल्याचीच अनुभूती येते. इतका तिच्या बोलण्यात आणि सांगण्यात भाव असतो.
२ ऊ. प्रार्थना : ‘परम पूज्य, तुमच्या कृपेमुळेच आमच्या दोघींची अतूट आणि जीवलग अशी मैत्री झाली. ‘तुम्ही मला तिच्यासारखी आध्यात्मिक मैत्रीण दिली’, हे माझे भाग्य आहे. स्वातीताईमध्ये ईश्वराचे अनेक गुण आहेत. ते मला आत्मसात करता येऊ दे. तिच्या मैत्रीचा मला लाभ करून घेता येऊ दे. आमची ही मैत्री तुम्हाला अपेक्षित अशी होऊन तुम्हीच आमच्या मैत्रीचा या साधनापथावरील प्रवास करवून घ्या’, अशी प्रार्थना करते.
एक आहे माझी गोड भावसखी ।
एक आहे माझी गोड भावसखी ।
नाव तिचे आहे स्वाती ॥ १ ॥
अंतरात असे तिच्या गुरूंप्रती अपार भक्ती ।
गुरुचरणी पोचण्यास करते ती युक्ती (टीप १ )॥ २ ॥
शरण जाते गुरुमाऊलीच्या चरणी अखंड ती ।
श्री गुरु देती तिला लढण्या (टीप २) शक्ती ॥ ३ ॥
आता संदीप यांना समवेत घेऊनी मार्गक्रमण करावे ।
लवकर संतपदी आरूढ व्हावे,
हीच शुभेच्छा आजच्या या शुभदिनी ॥ ४ ॥
टीप १ – साधनेचे प्रयत्न
टीप २ – स्वभावदोष आणि अहं यांच्याशी लढण्यासाठी
३. कु. मैथिली जोशी, सनातन आश्रम, गोवा.
३ अ. इतरांचा विचार करणे : ‘काही दिवसांपूर्वी तिला बरे नव्हते. तिच्या पोटात फार वेदना होत होत्या. तेव्हा ती ते सहन करण्याचा प्रयत्न करत होती. ‘तिला बरे वाटावे आणि सोबत व्हावी’, यासाठी मी तिच्याजवळ थांबले होते. थोड्या वेळाने तिने माझ्या सेवा रहातील; म्हणून मला सेवेला जायला सांगितले. तिला एवढा त्रास होत असतांनाही ती इतरांचा विचार करत होती.
३ आ. खोलीतील स्पंदने चांगली रहाण्यासाठी प्रयत्न करणे : काही दिवस स्वातीताई आणि मी एकाच खोलीत निवासाला होतो. ती सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा खोली झाडायची. झोपायला कितीही उशीर झाला, अगदी रात्रीचे १२ किंवा १ वाजला, तरी ती खोली झाडूनच झोपायची. मी तिला याविषयी विचारल्यावर ती मला म्हणाली, ‘‘खोली झाडल्यावर छान सात्त्विक वाटते. ‘खोलीतील स्पंदने खोली झाडल्यावर कशी पालटतात ?’, याचा तू अभ्यास कर.’’ खरेच तिने खोली झाडल्यावर खोलीतील स्पंदने पालटल्याचे आणि खोलीत चैतन्य वाढल्याचे जाणवायचे.’ (५.१२.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |