चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड एक अद्वितीय वर अन् वधू !
कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (९.१२.२०२०) या दिवशी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कु. स्वाती यांच्यामधील काव्यमय संभाषण येथे देत आहोत.
चि. संदीप आणि चि.सौ.कां. स्वाती यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
माझ्या पहाण्यातील अद्वितीय पती आणि पत्नी असलेले हे पहिलेच उदाहरण आहे. त्यांना देवाचा आशीर्वाद असल्याने त्यांची साधनेत जलद गतीने प्रगती होईल, याची मला खात्री आहे. विवाहाबद्दल दोघांना शुभेच्छा ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
गुरु आणि शिष्य यांच्यातील अतूट नाते दर्शवणारे भावमय काव्यपुष्प !
कवयित्री स्वाती
स्वाती वकिलीची परीक्षा (L.L.B) उत्तीर्ण झाली असली, तरी तिची प्रतिभा अखंड जागृत असते. सहज बोलता बोलता ती कवितेत बोलू लागते. मी लिहिलेल्या कवितांच्या पुस्तकातील काही कवितांना तिने कवितेच्या भाषेतच उत्तरे दिली आहेत. ९.१२.२०१३ या दिवशी ‘कु. स्वाती गायकवाड रामनाथी आश्रम सोडून मुंबईला ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’च्या सेवेसाठी जाणार आहे’, असे मला कळल्यावर मी तिला पुढील चिठ्ठी पाठवली. तेव्हा तिच्यात आणि माझ्यात झालेले काव्यमय संभाषण पुढे दिले आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राम वनवासात जाण्यापूर्वी सीतेचा निरोप घ्यायला जातो. तेव्हा सीता श्रीरामाला ‘निरोप कसला माझा घेता । जेथे राघव तेथे सीता ॥’, असे म्हणाली. याचप्रमाणे कु. स्वाती गायकवाड जेव्हा रामनाथी आश्रम सोडून मुंबईला जाईल, तेव्हा रामनाथी आश्रम तिला म्हणेल, ‘निरोप कसला माझा घेशी । जेथे स्वाती तेथे मीही ॥’
वरील ओळी लिहिलेला कागद मी कु. स्वाती गायकवाड हिच्याकडे पाठवला. दुसर्या दिवशी तिला कागद मिळाल्यावर तिने तात्काळ पुढील ओळी लिहिल्या. त्यानंतर आमचे कवितेच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे संभाषण चालू झाले.
कु. स्वाती गायकवाड
चराचरात देवा तूची व्यापूनी राहिला ।
अज्ञानी मी नाही दृष्टीने पाहिला ॥ १ ॥
दृष्टीही तूच देशी तुला अनुभवण्याला ।
प्रार्थना बाळाची गुरुचरणांना ॥ २ ॥
बाळाची हाक येता कानी, आई धावूनी जाई ।
तसेच प्रेम करी मजवर माझी गुरुमाई ॥ ३ ॥
(परात्पर गुरु) डॉ. आठवले
स्वातीत आहे इतर गुणांसह भाव ।
होणार आहे ती भावाचे सगुण रूप ॥ १ ॥
पुढे होईल भावाचे अव्यक्त रूप ।
प्रगती करील ती सत्वर ॥ २ ॥
नंतर जागृत करील समष्टी भाव ।
आदर्श होईल सकळांसी ॥ ३ ॥
कु. स्वाती गायकवाड
तुम्हापुढे लिहिण्याचे धारिष्ट्य मी काय करावे ?
शरणागतीने तव चरणांना सततच स्मरावे ॥ १ ॥
लीन रहाण्या देवा तूच शिकविसी ।
विलीन करून घेई वेगे तव चरणांसी ॥ २ ॥
(परात्पर गुरु) डॉ. आठवले
शरणागत आणि लीन भाव । आहे तुझिया रोमारोमांत ॥ १ ॥
विलीन झालीस केव्हाची । द्वैत राहिले केवळ कार्यासाठी ॥ २ ॥
कु. स्वाती गायकवाड
देवाने एक कोरा कागद देऊन पुढच्या पुढच्या ओळी लिहायला सांगितल्यावर ‘त्या कागदावर त्यांनी आधीच ओळी लिहिल्या असून मला केवळ त्या गिरवायच्या आहेत’, असे वाटत होते. तसेच ते (प.पू. डॉक्टर) ‘रामनाथी आश्रम (सूत्र १ पहा.) म्हणाला’, असे लिहित असल्याने ‘ते म्हणजेच रामनाथी आश्रम’, असा भाव ठेवून पुढील ओळी लिहिल्या गेल्या.
कोर्या कागदावरच्या तुमच्या ओळी तुम्हीच मला दाखवा ।
निर्गुण रूप तुमचे त्यातून तुम्हीच अनुभवायला शिकवा ॥ १ ॥
शाळेत जाऊन मूल जसे शिकते ‘अ, आ, इ…’ ।
तसे अध्यात्मातील धडे गिरवाया शिकवा हो गुरुमाई ॥ २ ॥
‘रामनाथी’ आणि ‘तुम्ही’ मज वेगळे कुठे भासता ?
तरीही नाव बदलून माझ्यासंगे लपंडाव का बरे खेळता ? ॥ ३ ॥
(परात्पर गुरु) डॉ. आठवले
काल मी ‘मधुराष्टकम्’चा मराठी अर्थ असलेली प्रत आणि त्यासोबत पुढील ओळी लिहून स्वातीला पाठवल्या.
‘मधुराष्टकम्’ केवळ वर्णन करितसे ।
तुझे लिखाण ज्ञानही देतसे ॥ १ ॥
कैसे वर्णू तुझ्या लिखाणा ।
मुग्ध होती सर्व तुझ्या लिखाणा ॥ २ ॥
कु. स्वाती गायकवाड
बुद्धीदाता, ज्ञानदाता आहात देवा तुम्ही ।
‘मधुराष्टकम्’मधून ‘गोड तुझे रूप’ अनुभवतो आम्ही ॥ १ ॥
तव स्मरणमात्रे मुग्ध होऊनी जीव एकरूप होई शिवाशी ।
गुरुमाऊलीचे गुण, रूप वर्णाया शब्द नसे मजपाशी ॥ २ ॥
(परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘शब्द नसे मजपाशी’ म्हणशी ।
परी शब्दांतून सर्व व्यक्तही करीशी ॥ १ ॥
काय म्हणावे अशा तुला ।
शब्दही माझे अपुरे पडती ॥ २ ॥
कु. स्वाती गायकवाड
देवाच्या ओळी वाचल्यावर मनात पुढच्या ओळी आल्या.
देवाचे आणि माझे नाते वाटे मज खास ।
कधी कधी वाटे हे सत्य आहे कि भास ॥ १ ॥
कृष्णसखा खेळे जसा गोप-गोपींसवे रास ।
तसा गुरुमाऊलीच्या सहवासात वाटे मज उल्हास ॥ २ ॥
स्वप्न माझे होते एकदा तुम्हा पहाण्याचे ।
ध्येय दिले तुम्ही चरणी विलीन होण्याचे ॥ ३ ॥
रामनाथीला आणून तुम्ही मला केले तुमचे कायमचे ।
फेरेही चुकतील आता जन्ममरणाचे ॥ ४ ॥
हसतमुख आणि आनंदी असलेले संदीप शिंदे !अद्वितीय स्वातीशी विवाह करणारा संदीप शिंदेही तिच्याच सारखा अद्वितीय आहे. त्याच्यासंदर्भातही किती लिहिले, तरी ते थोडेच होईल. त्याच्यासंदर्भात इतर साधकांनी लिहिलेल्या लेखावरून त्याची अद्वितीयता लक्षात येईल. ‘श्री. संदीप याचे मुखमंडल हसरे असून ‘तो आनंदी आहे’, हे लक्षात येते. त्याच्यासारखे अन्य साधकांचेही मुखमंडल हसरे असावे, असे मला वाटते. अशा हसतमुख आणि आनंदी संदीपला भावभक्तीमय असलेली स्वाती सहचारिणी मिळाल्याने त्या दोघांच्या आनंदात वाढ होईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
सर्वांची आवडती कु. स्वाती गायकवाड !
अ. वयाने खूप लहान वाटणे
८ वर्षांपूर्वी स्वाती जेव्हा आश्रमात प्रथम आली, तेव्हा तिचे वय २५ वर्षे असूनसुद्धा तिचा चेहरा, वागणे, बोलणे एखाद्या लाजर्या ७ – ८ वर्षे वयाच्या मुलीसारखे होते ! आताही ती १७ – १८ वर्षे वयाचीच वाटते !
आ. सर्वांची आवडती
स्वाती आश्रमातील लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सर्वांनाच ती आवडते.
१ इ. आदर्श मार्गदर्शक : स्वाती साधकांचे स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेते. तेव्हाही ती साधकांच्या चुका इतक्या प्रेमाने सांगते की, साधकांना तिच्याकडून शिकतांना आनंदच होतो.
१ उ. भावावस्था : ती अखंड भावावस्थेत असते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. डॉक्टर आणि कु. स्वाती गायकवाड यांचे काव्यमय संभाषण वाचून कु. वैष्णवी जाधव हिला सुचलेल्या काव्यमय भावओळी
लपंडाव काव्यांचा पाहूनी आनंद मजला होई ।
देवाची हार, भक्ताची शरणागती पाहून भाव जागृत माझा होई ॥ १ ॥
भक्तीने भारलेली स्वातीताई सखीरूपी मजला भेटली ।
आता काय लिहू गुरुराया, केवळ कृतज्ञता मनी दाटली ॥ २ ॥
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |