नवी मुंबई महानगरपालिकेची १५ डिसेंबरपासून मालमत्ताकर अभय योजना
नवी मुंबई – मालमत्ताकर धारकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मालमत्ताकर अभय योजना २०२०-२१’ घोषित केली आहे. १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या योजनेची मुदत असणार आहे. मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत असून त्यामधूनच नागरी सेवासुविधांची पूर्तता केली जात आहे. त्यामुळे या अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकीदार नागरिकांनी शहर विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन अभिजीत बांगर यांनी केले आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ताकर वसुली दरवर्षीपेक्षा अल्प झाली आहे.
थकबाकीसह कर भरण्यात नागरिकांनाही अडचणी आल्या आहेत. त्यामुळे थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रकमेवर ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. या दोन मासांच्या कालावधीत थकबाकीदार नागरिकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांची ७५ टक्के दंडात्मक रक्कम माफ होणार आहे; परंतु ही रक्कम त्यांना एकाचवेळी भरणा करावी लागेल. ती टप्प्याटप्प्याने भरता येणार नाही.