देशभरातील शेतकर्यांचा बंद शांततेतच !
‘बंद’ म्हणजे स्वतःच्या मागण्यांसाठी देश आणि जनता यांना वेठीस धरून त्यांची सहस्रो कोटी रुपयांची हानी करणारा गुन्हाच होय ! अशा प्रकारे हानी करणे जनताद्रोहच होय ! सरकारनेही कुणावर अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याकडे लक्ष द्यायला पाहिजे !
नवी देहली – केंद्र सरकारने संमत केलेल्या ३ कृषी विधेयकांच्या विरोधात शेतकर्यांनी पुकारलेला ८ डिसेंबरचा बंद शांततेत पार पडला. किरकोळ हिंसाचाराच्या घटना वगळता बंद शांततेत पार पडले. या बंदनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकर्यांच्या संघटनेला चर्चेसाठी आमंत्रित केल्याची माहिती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली.
१. सकाळी ११ ते दुपारी ३ या काळात करण्यात आलेल्या बंदच्या वेळी देहलीच्या सीमेवर गेले १३ दिवस आंदोलन करणार्या शेतकर्यांनी आवश्यक सेवांना अनुमती देत येथील रस्ताबंद करून ठेवला होता.
२. देहलीतील आम आदमी पक्षाने आरोप केला की, राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देहली पोलिसांनी घरामध्ये नजरकैदेत ठेवले; मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला.
३. जयपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. या वेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत झटापट झाली, तसेच दगडफेक करण्यात आली.
४. बिहारमध्येही बंद पाळण्यात आला. राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्ताबंद केला, तसेच काही ठिकाणी निदर्शने केली.
५. उत्तरप्रदेशमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. लक्ष्मणपुरी येथे कलम १४४ लागू करण्यात आले होते. प्रयागराज येथे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे गाडी रोखून धरली.
६. बंगालमध्ये कामगार संघटनांनी शेतकर्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मोर्चा काढला.
७. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेबाहेर आंदोलनाचे समर्थन केले. कलबुर्गी येथे साम्यवाद्यांनी निदर्शने केली. बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये साम्यवादी पक्षांनी रेल्वे गाड्या अडवल्या.
८. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथेही रेल्वे स्थानकात आंदोलकांनी गाड्या अडवल्या.
९. गुजरातमध्ये अहमदाबाद-विरमगाम महामार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्ताबंद आंदोलन केले. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. आंदोलकांनी वडोदरा आणि भरुच येथे राष्ट्रीय महामार्ग बंद केला होता. पोलिसांनी कर्णावती येथे काही आंदोलकांना कह्यात घेतले.