कोरोना काळातील ६ मासांच्या कालावधीसाठी वाहनकराविषयी सरसकट करसवलत !
पुणे – नव्या आणि सुधारित आदेशानुसार ३१ मार्च २०२० पर्यंतचा कर भरलेल्या वाहनांना पुढील करात ५० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच वार्षिक कर भरणार्या परिवहन संवर्गातील सर्व प्रकारच्या वाहनांना कोरोना काळातील एप्रिल ते सप्टेंबर २०२० या ६ मासांच्या कालावधीसाठी सरसकट करसवलत देण्याविषयीचे नवे आदेश शासनाने काढले आहेत. या कालावधीतील कर भरला असल्यास तो कर पुढील ६ मासांसाठी समायोजित करण्यात येणार आहे. याविषयी पूर्वी काढण्यात आलेल्या ३ आदेशांमध्ये पुरेशी स्पष्टता नसल्याने करसवलतीतून अनेक वाहतूकदार वंचित रहाण्याची शक्यता होती, असे राज्य माल आणि प्रवासी वाहतूकदार महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.
दळणवळण बंदीनंतर व्यावसायिक वाहने बंद असल्याने कराचा भरणा कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित करून करसवलतीविषयी वाहतूकदारांनी मागणी केली होती. तसेच दरम्यानच्या काळात करसवलतीच्या ६ मासांच्या कालावधीतील कर थकीत दाखवून त्याविषयी दंडाची आकारणीही चालू करण्यात आली होती. या सर्वच सूत्रांवर वाहतूकदारांनी शासकीय पातळीवर बैठका घेऊन आदेशात स्पष्टता आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने नवे आदेश काढले आहेत.